जाहीर सभेत अजितदादांनी दिली कबुली ;शरद पवारांना सोडणं ही माझी मोठी चूक
Ajit Dada confessed in a public meeting; Leaving Sharad Pawar was my big mistake
अजित पवारांनी काका शरद पवारांचा हात सोडला अन् ते महायुतीत सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासह पवार कुटुंबात फूट पडली. काहींनी अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
तर काहींनी त्यांचा कडाडून विरोध केला. पण या निर्णयाबद्दल स्वत: अजित पवारांना काय वाटतं? महायुतीत सहभागी झाल्यानंतर वर्षभराने अजित पवार यावर बोलते झाले.
अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात होती. गडचिरोलीतील या जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी यावर भाष्य केलंय.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम- हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यावर बोलताना अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
वडिलांचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं. तेवढं लेकीवर प्रेम कुणीच करू शकत नाही. असं असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, हे बरोबर नाही.
समाजाला हे आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. ती माझी चूक मी मान्य केली आहे, असं अजित पवार म्हणाले.
धर्माराव बाबाच्या मुलीने दुसऱ्या पक्षात जाण्याचा ठरवलं आहे, अस बाबाने सांगितलं. ती आता बाबाच्या विरोधात उभी राहील म्हणतेय, पण हे शोभतं का? तुम्ही अशा गोष्टीत लक्ष देऊ नका.
मी तिला सांगू इच्छितो की, वस्ताद सगळे डाव शिकवतो. पण एक डाव स्वतःसाठी राखून ठेवतो. तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये. म्हणून मी सांगतो, तुम्ही बाबाच्या मागे उभे राहा. त्यांना निवडून आणा, असं अजित पवार म्हणाले.
आम्ही चांगल्या योजना जनतेला दिल्या आहेत. आम्ही मुलींसाठी एक योजना आणली. मुलीला 18 वर्षाची झाल्यावर 1 लाख रुपये मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1 कोटी 60 लाख महिलांना 3 हजारचं वाटप केलं. ज्या राहिल्या त्यांनी सुद्धा अर्ज करावा. त्याची काल मर्यादा वाढविली आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.