विधानसभेसाठी भाजपचे 50 टक्के जागांवरील उमेदवार ठरले
50 percent of BJP's candidates for the Legislative Assembly

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपच्या गोटात जोरदार मोर्चेबांधणी आणि तयारी सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री आणि पक्षसंघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते
असा लौकिक असणाऱ्या अमित शाह यांनी नुकताच मुंबई दौरा केला. या दौऱ्यात अमित शाह यांनी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांशी सखोल चर्चा केली.
रविवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर झालेली ही बैठक रात्री उशीरापर्यंत सुरु होती. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली.
‘द हिंदू’ दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार,अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावानुसार,
आगामी विधानसभा निवडणुकीत 25 जागांवर महायुतीतील पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. महायुतीतील तीन पक्षांमध्ये अनेक जागांवरुन तिढा आहे.
यामध्ये इंदापूर, अमरावती यासारख्या मतदारसंघांचा समावेश आहे. यावर कोणताही तोडगा निघण्याची शक्यता दिसत नसल्याने या जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी,
जेणेकरुन वाद वाढणार नाहीत, असा प्रस्ताव महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी मांडल्याचे समजते. यावर शिंदे गट आणि अजितदादा गट काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आगामी आठवड्यात दिल्लीत जागावाटपाबाबत आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना ओबीसी समाजावर लक्ष केंद्रित करण्याचाही सल्ला देण्यात आल्याचेही समजते. विधानसभेच्या उमेदवारांची निवड करताना याचा परिणाम दिसू शकतो.
लोकसभा निवडणुकीतील चुकीपासून धडा घेत भाजपने यावेळी उमेदवार लवकर निश्चित केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 50 टक्के उमेदवार निश्चित झाले आहेत.
भाजपने निवडलेल्या उमेदवारांना दसऱ्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून फोन करुन तसे कळवण्यात येईल,अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी ‘द हिंदू’ला दिली आहे.
अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आपल्याला मुख्यमंत्री व्हायची असल्याची इच्छा भाजपचे नेते अमित शाह यांच्यासमोर बोलून दाखवल्याचे समजते.
मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीवेळी अजित पवार यांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला. यावर आता भाजप काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.