महाविकास आघाडीत तीन नेत्यांना उमेदवार ठरविण्याचे अधिकार
Power to nominate three leaders as candidates in the Mahavikas Aghadi

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आम्ही तीन जणांची समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेनेचे संजय राऊत या कमिटीत असतील.
हे तिन्ही नेते कुणाला उमेदवारी द्यायची हे ठरवतील. येत्या दहा दिवसात त्यांचा अहवाल ही समिती देणार आहे, अशी माहिती
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली आहे. विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरच्या आत पार पडतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीची निवडणूक रणनीतीच स्पष्ट केली. योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आम्ही तीन लोकांची कमिटी केली आहे
. जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊत या तीन नेत्यांना निर्णय घेण्याचा, शिफारस करण्याचे अधिकार दिले आहेत. प्रत्येक तालुक्यात जाऊन ही समिती सर्व्हे करणार आहे.
जे लोक निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याबाबतचा लोकांचा कल जाणून घेणार आहेत. जो ओरिजिनल इच्छुक आहे, त्याला काही विचारलं जाणार नाही.
तर गावातील सामान्य लोकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. तसेच दूध संस्था, सहकारी संस्था आणि इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊनच उमेदवार ठरवला जाणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
येत्या 8 ते 10 दिवसात या गोष्टी संपवायच्या आहेत. आपली कमिटी तिचं म्हणणं मांडेल. त्यानंतर इच्छुक उमेदवाराबाबत निर्णय घेतला जाईल, असं सांगतानाच प्रत्येकाला वाटतं आपल्या मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून येईल.
पण तसं नसतं. आघाडी म्हटल्यावर काही निर्णय घ्यावे लागतात. चर्चा करून जागा सोडली जाईल. नुसती सोडली जाणार नाही तर त्याचा प्रचार करून निवडूनही आणावे लागणार आहे, असंशरद पवार यांनी सांगितलं.
गेल्या दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आली. त्यांनी राजकीय पक्षांशी चर्चा केली. माझा अंदाज आहे की 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील.
त्या दिवसांपासून आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर अर्ज स्वीकारले जातील. साधारण 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला.
तुम्हाला लोकसभेचं चित्र आठवत असेल. त्यावेळी वेगळं वातावरण झालं होतं. 400च्यावर जागा येतील असं मोदी सांगत होते. अनेक राजकीय पक्षाचे नेते वेगळे आडाखे बांधत होते.
पण महाराष्ट्रातील जनतेचा सूर वेगळा आहे हे जाणवत होतं. नेते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. पण सामान्य कार्यकर्ता जो काही निर्णय घेतो, त्याची बांधिलकी मतदारांशी असते.
कार्यकर्त्यांचं मत वेगळं होतं हे मला माहीत होतं. आम्ही तीन पक्षांना एकत्र केलं. त्यावेळी माझ्या वाचनात आलं की, हे लोक (महाविकास आघाडी) एकत्र आले खरे पण हाताच्या बोटावर मोजण्या इतके यांचे लोक निवडून येणार नाहीत,
असं म्हटलं जात होतं. पण तरुण पिढी आणि कार्यकर्ता यांची सामान्य जनतेशी नाळ तुटली नाही हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळेच आपला विजय झाला, असं पवार म्हणाले.
काही लोक हवामान पाहून पाऊस पडेल की नाही अंदाज घेतात. तसा काही लोकांना अंदाज आलाय, पाऊस पाणी चांगला होईल, असं त्यांना वाटतंय. लोकांमध्ये आपली आस्था वाढली आहे.
सकाळी झोपेतून उठल्यावर कोणत्याही गावी जा. मी काल नगरला होतो, जामखेडला होतो, रत्नागिरीला होतो. कुठेही गेलो तरी कार्यकर्ते जमतात आणि लोक जमतात.
ते अपेक्षा करतात. त्यांचा हक्क आहे. पण संधीची अपेक्षा करतात हे काही चूक नाही. आपल्याला उद्याचं चित्र बदलायचं आहे. वाटेल ते कष्ट घ्यायचे आहेत.
तुम्ही चांगले कष्ट करता. त्यामुळे चांगला निकाल लागेल याबाबत आमच्या मनात शंका नाही, असंही ते म्हणाले.