मराठवाड्यातील महायुतीतील कॅबिनेट मंत्र्यांचा पुतण्या तुतारी फुंकणार ?
Will the nephew of the cabinet minister in the grand coalition in Marathwada blow the trumpet?

सध्या 85 वर्षाच्या तरुण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घातली असून प्रत्येकाला त्यांच्या पक्षाची तुतारीच हातात घायची आहे.
यातून बलाढ्य राजकीय नेत्यांच्या कुटुंबातही फूट पडताना दिसत असून राज्याचे आरोग्य मंत्री व शिंदे सेनेचे ताकदवान नेते म्हणून ओळख असलेल्या
तानाजी सावंत यांच्या पुतण्याने आता उघडपणे शरद पवार यांच्याच विचारासोबत राहणार असल्याची भूमिका आज स्पष्ट केली.
अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राज्यात चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र आज एबीपी माझाशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आता शरद पवार यांच्यात सोबत राहण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.
शरद पवार यांचे विचार आपल्याला पहिल्यापासून भावतात. त्यामुळे आपण शरद पवार यांच्याच पाठीशी राहणार, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
सावंत कुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असले तरी मला शरद पवार यांच्यासोबत राहायचे असून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा जिल्हा वेगळा, पक्ष वेगळा आहे आणि त्यांचे विचारही वेगळे आहेत.
मात्र, माझे विचार शरद पवार साहेबांसोबत राहण्याचे असल्याचे अनिल सावंत यांनी सांगितले. कुटुंब म्हणून आम्ही परिवार एक असलो तरी आमच्यात राजकीय मतभेद असल्याने
मी या वेळेला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांची तुतारी मागितली आहे. यासाठी पवार साहेब व सुप्रियाताई यांची भेट घेतली आहे. माझी या मतदारसंघासाठी असणारी विकासाची भूमिका मी साहेबांना सांगितली आहे, असे त्यांनी म्हटले.
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास आजवर म्हणावा तसा झालेला नाही असे सांगताना दुष्काळी मंगळवेढ्याच्या 32 गावांचा पाणी प्रश्न तर प्रत्येक निवडणुकीत गाजत आलेला आहे.
मला संधी दिल्यास परत कुठल्याही निवडणुकीत मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न येणार नाही,, असा दावा देखील अनिल सावंत यांनी केला आहे.
आपल्याला उमेदवारी मिळाली तर आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ असे सांगताना आपल्याला उमेदवारी जरी मिळाली नाही तरी साहेब सांगतील त्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करून दाखवू, असा विश्वास अनिल सावंत यांनी केला आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या राजकीय घराण्यातील पुतणे शरद पवार यांच्या मागे उभे राहताना दिसत असून अनिल सावंत यांच्यामुळे थेट एकनाथ शिंदे गटालाच मोठा हादरा बसला आहे.
आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे महायुतीतील एक मोठा नेता अशी त्यांची ओळख असून त्यांच्याच पुतण्याने आता उघड शरद पवार यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतल्याने महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत.
तसे पाहता सर्वच पुतणे सध्या शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत असून अनिल सावंत यांच्यामुळे अजून एक पुतण्या आता शरद पवार यांच्याकडे निघाला आहे.
अनिल सावंत हे मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यात गावोगावी दौरे करत असून महिलांसाठी खेळ पैठणीचा हा त्यांचा कार्यक्रम सध्या लोकप्रिय होत आहे.
मंगळवेढा तालुक्यात लवंगी येथे अनिल सावंत यांचा साखर कारखाना असून कारखान्याच्या माध्यमातूनही सावंत हे शेतकऱ्यांच्या संपर्कात असतात.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून भगीरथ भालके हे तुतारीकडून इच्छुक असून त्यांच्या शिवाय वसंतराव देशमुख, नागेश भोसले असे अनेक दिग्गज तुतारीकडे तिकीट मागत आहेत.
त्यातच अनिल सावंत यांनी मागणी केल्यामुळे या मतदारसंघाची रंगत वाढत चालली आहे. आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी शरद पवार
नेमके कुणाला उमेदवारी देणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पुतण्या परत काकांना वरचढ ठरणार का? हे तिकीट वाटपानंतर स्पष्ट होणार आहे.