भाजप नेता शरद पवारांचा भेटीला आला आणि पक्ष प्रवेश उरकून टाकला
BJP leader came to meet Sharad Pawar and finalized the party entry
लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच बदलय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी
शरद पवारांची साथ सोडत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, आता शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी दिग्गज नेत्यांनी रांगा लावल्या आहेत.
खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.
स्वतः राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमाशी बोलताना ही घोषणा केलीये. राजेंद्र अण्णा देशमुख खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
शरद पवार यांच्या सांगली दौऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग आलाय. शरद पवार यांना भेटण्यासाठी जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची लगबग वाढली आहे.
अनेकजण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. प्रामुख्याने खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे इच्छुक आज (दि. 3) शरद पवार यांच्या भेटीला आले होते.
खानापूर आटपाडी मतदार संघाचे माजी आमदार आणि सध्या भाजप मध्ये असलेले राजेंद्र अण्णा देशमुख शरद पवार यांच्या भेटीला आले होते. दरम्यान, बाहेर आल्यानंतर त्यांना मी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला असल्याची घोषणा केली.
अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले त्यांचे पुत्र वैभव पाटील देखील शरद पवार यांच्या भेटीला आले होते. राजेंद्र अण्णा देशमुख आणि वैभव पाटील खानापूर आटपाडी मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
महायुतीतून एकनाथ शिंदे गटाचे सुहास बाबर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने , राजेंद्र अण्णा देशमुख आणि वैभव पाटील अस्वस्थ असल्याचे बोलले जाते.
सांगली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि सांगली विधानसभेसाठी इच्छुक असलेले पृथ्वीराज पाटील हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी आले आहेत.
पृथ्वीराज पाटील आणि शरद पवार यांच्यात गोपनीय चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, इंदापुरात भाजप नेते हर्षवर्धन पाटील देखील तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत.