मराठवाड्यातील भुरट्या उप जिल्हाधिकाऱ्याकडून लाखोंचा गंडा ;पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Bhurtya Deputy Collector of Marathwada extorted lakhs of rupees; the police smiled.
स्वतः आयएएस अधिकारी असल्याचे आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असल्याची थाप मारून
तीन उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांना जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक पदावर नोकरीचे आमिष दाखवून ४० लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार अक्कलकोटमध्ये उजेडात आला आहे.
संबंधित तोतया आयएएस अधिकाऱ्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.पवन मारुती पांढरे (वय २०, रा. कासार शिरसी, ता. निलंगा, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या
तोतया आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. पुढील तपासाकरिता त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश अक्कलकोटच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे.
या संदर्भात फसवणूक झालेल्या एका तरुणाचे नातेवाईक असलेले विठ्ठल गुंडेराव वाघमोडे (वय ६३, रा. संत ज्ञानेश्वर नगर, राजीव गांधी चौक, लातूर)
यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार हा फसवणुकीचा प्रकार मागील दोन वर्षांपासून घडत आला आहे.
पवन पांढरे त्याने स्वतः केंद्रीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे मराठवाडा भागात काही जणांना सांगितले होते.
भेटायला येणाऱ्यांना तो ओळखपत्र आणि अन्य कागदपत्रे दाखवायचा. सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिकपदाची भरती होत असून,
आपल्या ओळखीने नोकरी लागू शकते, असा संदेशही त्याने पाठविला होता. त्याचे प्रभावी व्यक्तिमत्त्व, भाषा कौशल्य पाहून प्रभावित झालेल्या काही जणांनी त्याच्याशी संपर्कही साधला.
यात लातूरचे विठ्ठल वाघमोडे यांनी आपल्या एका नातेवाइकाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी मिळण्यासाठी पवन पांढरे याच्याशी संपर्क साधला असता,
त्याने या कामासाठी अक्कलकोटमध्ये येण्यास सांगितले. त्यानुसार वाघमोडे यांनी आपल्या नात्यातील उच्चशिक्षित तरुणासोबत अक्कलकोटमध्ये पवन पांढरे याची भेट घेतली.
याशिवाय अन्य दोन उच्चशिक्षित तरुणांनीही नोकरी मिळण्यासाठी त्याची भेट घेतली. त्यांच्यावर छाप पाडून पवन पांढरे याने नोकरीचे आमिष दाखवून तिघांकडून ४० लाख रुपयांची रक्कम उकळली.
नंतर तिघांना लिपिकपदावरील नियुक्तीचे पत्रही दिले. सत्य उजेडात आल्यानंतर तिघा बेरोजगार तरुणांसह त्यांच्या पालकांना धक्का बसला. पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार तपास करीत आहेत.