अजितदादांना धक्का;राष्ट्रवादीच्या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
Shock to Ajit Dada; Nationalist MLA joins BJP

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) एकमेव आमदार कमलेश सिंह यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
गेल्या वर्षी एक नोव्हेंबर रोजी हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेणाऱ्या कमलेश यांनी पलामू जिल्ह्यात पक्षाला बळकट करणार असल्याचे ठासून सांगितले. ते हुसेनाबाद येथून आमदार आहेत.
झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी पक्षाच्या मुख्यालयात कमलेश यांचे पक्षात स्वागत केले. सिंह यांच्या भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला एक नवीन ताकद आणि शक्ती मिळेल, असे मरांडी म्हणाले.
आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंडचे भाजपचे निवडणूक सह-प्रभारी हिमंता बिस्वा सरमा हे देखील यावेळी उपस्थित होते.
कमलेश हे भाजपचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. झारखंड विधानसभेत त्यांनी अनेक प्रसंगी भाजपला पाठिंबा दिला.
त्यांनी आज अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला,’ असे सरमा यांनी सांगितले. यावेळी सिंह म्हणाले की, भाजप राज्याचे भविष्य आणि प्रतिमा बदलण्यासाठी लढत आहे.
पलामू जिल्ह्यातील हुसेनाबादला स्वतंत्र जिल्हा म्हणून नियुक्त करण्याची कमलेश यांची मागणी होती. मात्र, ती पूर्ण न झाल्याने त्यांनी सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून पाठिंबा काढून घेतला होता.
महाराष्ट्रात मध्यंतरी राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले. त्यानंतर कमेलश यांनी ‘राष्ट्रवादी’तील अजित पवार गटाशी जुळवून घेतले होते.
दुसरीकडे, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून पवार विरूद्ध पवार असा संघर्ष पहायला मिळाल्यानंतर असेच चित्र विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात पहायला मिळू शकेल,
असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जतच्या जागेवरील दावा सोडून देण्याचे ठरविल्याचे कळते.
सर्वेच्या आधारे पुढे आलेल्या माहितीवरून ती जागा महायुतीत भाजपला सोडण्याची तयारी दर्शविण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तेथे आमदार रोहित पवार विरूद्ध आमदार राम शिंदे अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत.