हरियाणात काँग्रेसची मुसंडी
Congress in Haryana

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजता प्रथम पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली.
त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या तासाभरातच काँग्रेस पक्षाने हरियाणात एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जोरदार मुसंडी मारली आहे.
त्यामुळे काँग्रेस पक्ष हरियाणात एकहाती सत्ता स्थापन करेल, असे संकेत मिळत आहेत. तर भाजपला एक्झिट पोलच्या अंदाजानुसार वर्तविण्यात आलेल्या जागांच्या आसपासच प्रत्यक्षातही तेवढ्याच जागा मिळतील, असे दिसत आहे.
मतमोजणीच्या आतापर्यंतच्या डेटानुसार, हरियाणात सध्या काँग्रेस 62, भाजप 24, आम आदमी पक्ष 0, लोक दल 2 आणि अपक्ष उमेदवार 7 जागांवर आघाडीवर आहेत.
विधानसभेच्या 90 जागा असलेल्या हरियाणात बहुमताने सरकार स्थापन करण्यासाठीची मॅजिक फिगर 45 इतकी आहे. सध्या काँग्रेसचे उमेदवार 62 जागांवर आघाडीवर आहेत.
ही परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात काँग्रेसचे सरकार येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजपचे हरियाणात सलग
तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचे स्वप्न भंग पावण्याची शक्यता आहे. आता मतमोजणीच्या पुढील काही तासांमध्ये हे कल बदलणार का, हे पाहावे लागेल.
सध्या हरियाणात काँग्रेसने जवळपास 62 जागांवर भक्कम आघाडी घेतली आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस सरकार स्थापन करेल, असे संकेत मिळत आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर हिंदी पट्ट्यातील हरियाणाची सत्ता गमावणे, हा भाजपसाठी मोठा धक्का ठरणार आहे. शेतकरी आंदोलन आणि कुस्तीपटूंचे आंदोलन हाताळण्यात भाजप सरकारने दाखवलेली असंवेदनशीलता
हरियाणातील भाजपच्या पराभवाचे मुख्य कारण ठरेल, अशी चर्चा होती. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाने पक्षातील अंतर्गत नाराजी वेळीच थोपवून धरत जातींची समीकरणे योग्यपणे साधली होती.
त्यामुळे हरियाणात काँग्रेसची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत. हरियाणातील प्राथमिक कल हाती आल्यानंतर दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे.