सायबर सेलचे पोलीस चक्क आपल्याच महिला SP ची करत होते हेरगिरी ; 7 जणांवर निलंबनाची कारवाई
The cyber cell police were actually spying on their own female SP; Suspension action against 7 persons

राजस्थानमधील भिवडी येथे पोलीस विभागातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस विभागातील भोंगळा कारभार समोर आला आहे.
भिवाडी येथे तैनात पोलीस कर्मचारी आपल्याच खात्यातील पोलीस अधिक्षकांवर म्हणजेच जिल्ह्यातील एसपींवर नजर ठेऊन होते.
एसपींची लोकेशन पोलीस कर्मचारीच ट्रेस करुन त्यांच्यावर नजर ठेवून होते. 15 हून अधिक वेळा एसपींचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं.
त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून त्यांच्यावर पोलीस खात्याकडून नजर ठेवली जात होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस खात्यात एकच गोंधळ उडाला. भिवडी येथील 7 पोलिस कर्मचाऱ्यांना या प्रकरणात बडतर्फ करण्यात आलं आहे.
पोलीस विभागातील सायबर सेलचे अधिकारी आणि कर्मचारी भिवडीच्या एसपी ज्येष्ठा मैत्रेयी यांचा फोन ट्रेस करत होते. एसपी कुठे जातात? त्या काय करतात? यावर हे कर्मचारी लक्ष ठेऊन होते.
हे प्रकरण समोर आल्यानंतर ज्येष्ठा यांनी सायबर सेलचे प्रमुख पोलीस निरिक्षकांसहीत मुख्य हावालदार आणि पाच कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केलं आहे.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती ज्येष्ठा मैत्रेयी यांनी पोलीस विभागातील वरिष्ठांना कळवली आहे. जयपूर रेंजमधील पोलीस अधिक्षक अजय पाल लांबा यांनी या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली जात असल्याची माहिती दिली.
या प्रकरणात सात जणांना निलंबित करण्यात आलं आहे. या सात जणांनीच वेळोवेळी भिवडीच्या एसपी ज्येष्ठा यांची लोकेशन ट्रेस केली होती.
एसपी ज्येष्ठा मैत्रेयी यांनी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, त्या प्रमाणिकपणे त्यांचं काम करत आहेत. मात्र आपल्यावर आपल्याच विभागातील लोकांची नजर आहे याची अजिबात कल्पना नव्हती असंही त्यांनी सांगितलं.
यासंदर्भातील चाहूल लागल्याने चौकशी केली असता खरोखरच आपल्यावर नजर ठेवली जात असल्याचं ज्येष्ठा मैत्रेयी यांच्या लक्षात आलं आणि या सात कर्मचाऱ्यांना त्यांनी रंगेहाथ पकडलं.
भिवाडी सायबर सेलचे प्रमुख पोलीस निरिक्षक श्रावण जोशी, मुख्य हावालदार अवनीश कुमार, हवालदार राहुल, सतीश, दीपक,
भीम आणि रोहतास यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणात अजून पोलीस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचा काही सहभाग आहे का याचा तपास केला जात आहे.
एसपी ज्येष्ठा मैत्रेयी या मूळच्या उत्तर प्रदेशमधील गुना येथील रहिवाशी आहेत. त्या 2017 मध्ये युपीएसी सिव्हील सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
त्यानंतर 2018 साली त्यांनी प्रशिक्षक पूर्ण केल्यानंतर राजस्थान कॅडरमध्ये पहिल्यांदा उदयपूरमधील गिरवा सर्कलमध्ये एसएसपी म्हणून नियुक्ती स्वीकारली.
त्यानंतर भीलवाडा येथे त्यांना एसपी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांना जयपूरमधील गुन्हे शाखेच्या डीसीपी पदावर नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर त्यांची पुन्हा भिडवाडीच्या एसपी पदावर नियुक्त केली गेली.