कारवाईवरून शिंदे गटाच्या दोन नेत्यांमध्ये जुंपली
Due to the action, Shinde met two leaders of the group
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी विधाने केल्याचा आरोप करीत त्यांची पक्षातून हकालपट्टीची मागणी सुरू असताना माजी खासदार आनंदराव अडसूळ त्यांच्या मदतीला धावून आले आहेत.
कीर्तिकर यांच्यावर आम्ही कारवाई होऊ देणार नाही, असे नमूद करतानाच अडसूळ यांनी दरेकर यांना विनाकारण न बोलण्याचा सल्ला दिला.
गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी शिशिर शिंदे यांनी केली आहे. त्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीही कीर्तिकर यांना लक्ष्य केले.
अमोल कीर्तिकर यांना निवडून आणण्यासाठी गजानन कीर्तिकर यांनी कट रचल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. या पार्श्वभूमीवर अडसूळ यांनी शिशिर शिंदे यांना लक्ष्य केले.
‘शिशिर शिंदे कोण आहेत’, असा प्रश्न विचारत अडसूळ यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले.
अमित शहा यांनी आम्हाला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांनी विनाकारण बोलू नये, महायुतीत ऐक्य नाही, असे लोक म्हणतील असेही आनंदराव अडसूळ यांनी म्हटले आहे.
आपण कोणाविषयी बोलतोय याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. ज्याने अनेक वर्ष काम केले, अशा माणसावर आरोप करताना आपण कोण आहोत? आपण किती छोटे आहोत?
किंवा ती माणसं किती मोठी आहेत एवढा तरी विचार केला पाहिजे, अशा शब्दात आनंदराव अडसूळ यांनी शिशिर शिंदे यांना सुनावले.
महायुतीतला उमेदवार निवडून आणणे, हे महायुतीमधल्या सर्व पक्षांचे काम आहे. गजानन कीर्तिकर यांचे विधान, त्यांची भूमिका महायुतीच्या युतीधर्माला छेद देणारी आहे, आम्ही याचा निषेध करतो,’ अशा शब्दांत शेलार यांनी टीका केली होती. त्यावर अडसूळ यांनी प्रत्युत्तर दिले.
‘गजानन कीर्तिकर काय म्हणाले? मी माझ्या मुलासाठी काम करू शकलो नाही, याची माझ्या मनामध्ये खंत आहे. खंत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांनी त्यांच्या मुलासाठी काम केलेले नाही.
कुठल्याही वडिलांना असे वाटणे स्वाभाविक आहे. माझ्या घरात, माझा मुलगा असणे यात जगावेगळी गोष्ट आहे का? मी जोगेश्वरीत गेलो होतो.
बैठक घेतली. बऱ्याच पदाधिकाऱ्यांना भेटलो. पुराव्यानिशी बोलावे, आरोपासाठी आरोप नको. महायुतीमध्ये आहोत, याची जाणीव ठेवा,’ अशा शब्दांत अडसूळ यांनी शेलारांचे कान टोचले.