जानकरांच्या पक्षात फूट ;न्यू राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना ;अडचणीत वाढ
Split in Jankar's party; formation of New Rashtriya Samaj Party; rise in difficulty
एका बाजूला महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष वेगळी वाट निवडत विधानसभा रिंगणात उतरला आहे. आता अशातच न्यू राष्ट्रीय समाज पक्ष या नवीन पक्षाची एन्ट्री झाली आहे.
या पक्षाच्या पहिल्या उमेदवारांची यादी देखील सरचिटणीस रामचंद्र घुटुकडे यांनी जाहीर केली आहे. न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा ही राष्ट्रीय समाज पक्षासारखाच असल्याने महादेव जानकर यांच्या उमेदवारांच्या अडचणी देखील वाढणार आहेत.
दरम्यान, न्यू राष्ट्रीय समाज पक्षानं पिपाणी चिन्हाचा आग्रह धरला आहे. त्यामुळं लोकसभेनंतर विधानसभेलाही शरद पवार गटाला पिपाणी पुन्हा अडचणीत आणणारी ठरणार आहे.
आपल्या सर्व उमेदवारांसाठी पिपाणी हे चिन्ह न्यू राष्ट्रीय समाज पक्ष घेणार असल्याचे सरचिटणीस रामचंद्र घुटुकडे यांनी सांगितले आहे.
या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष काशिनाथ पाल असून त्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत सर्व धनगर समाजाचे उमेदवार आहेत. राज्यातील धनगर बहुल मतदार संघात पहिले उमेदवार जाहीर केले असून
सांगोल्यातून प्राध्यापक आर वाय घुटुकडे यांना उमेदवारी दिली आहे. या पक्षाचे सरचिटणीस रामचंद्र घुटुकडे यांनी माढा लोकसभेत पिपाणी चिन्ह घेऊन निवडणूक लढवली होती.
यावेळी माढा लोकसभेत घुटुकडे यांना तब्बल 58 हजार मतं पिपाणी चिन्हावर मिळाली होती यावेळी पिपाणी चिन्हावर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे आक्षेप घेऊनही हे चिन्ह कायम राहिल्यानेआता न्यू राष्ट्रीय समाज पक्ष आपल्या सर्व उमेदवारांसाठी पिपाणी हेच चिन्ह मागणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राज्याच्या सर्वच भागात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे.
महायुतीसह महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. मात्र, अनेक छोटे पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आहेत.
अशातच आज न्यू राष्ट्रीय समाज पक्षानं उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
त्यामुळं सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारात व्यवस्त आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणारआहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे.