उमेदवारी न मिळाल्याने भाजपचा मोठा नेता, थेट ठाकरेंच्या सेनेत जाण्याच्या तयारीत ?
Big leader of BJP preparing to go directly to Thackeray's Sena after not getting nomination?
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपली 99 जणांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांबरोबर नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.
20 ऑक्टोबर रोजी दुपारी ही यादी जाहीर केल्यानंतर तिकीट न मिळालेल्या इच्छूकांची नाराजी दूर करण्याचं आव्हान पक्षातील वरिष्ठ नेत्यांसमोर असतानाच
काहींनी लगेच टोकाचा निर्णय घेत बंडखोरी करण्याचा मार्ग स्वीकारल्याचंही दिसत आहे. असाच राजकीय ड्रामा दक्षिण मुंबईमध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
विधानसभेची भाजपाची पहिली यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी दक्षिण मुंबईसारख्या हाय प्रोफाइल मतदारसंघातून होणार असल्याची राजकीय चर्चा आहे.
दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना तिकीट दिलं आहे. मात्र दक्षिण मुंबईमधून भाजपाला या निर्णयानंतर माजी मंत्री राज पुरोहित मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
राज पुरोहित हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘झी 24 तास’ला दिली आहे. पुरोहित हे कुलाबा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत.
पुरोहित यांनी भारतीय जनता पार्टीकडे कुलाब्यामधून तिकीट देण्याची मागणी केली होती. मात्र त्यांची ही मागणी पक्षाने डावलली.
या मतदारसंघातून भाजपाने राहुल नार्वेकरांना तिकीट दिलं असल्याने आता पुरोहित बंडखोरीच्या मार्गावर असल्याची माहिती मिळत आहे. राज पुरोहित हे मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष असून पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत.
बंडखोरी करुन पुरोहित उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून राज पुरोहित यांच्यासारख्या
अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याला राहुल नार्वेकरांविरुद्ध तिकीट दिलं जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. खरोखरच पुरोहित यांना तिकीट मिळालं तर कुलाब्यामध्ये पुरोहित विरुद्ध नार्वेकर अशी रंगतदार लढत पाहायला मिळू शकते.