पूर्णेत भरदिवसा थरार…कॉलेज कॅम्पसमध्ये भर दिवसा गोळीबारात युवक ठार
Full-day thrill in Purne... Youth killed in broad-day firing in college campus

चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी थरारक घटना परभणी जिल्ह्यातील पूर्ण शहरात एका कॉलेजच्या परिसरात घडली आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये भर दिवसा गोळीबार झाला आहे.
यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी हॉस्टेल परिसर सील केला पोलिस हॉस्टेल परिसरात कसून चौकशी करत आहेत.
परभणीतील पूर्णा येथील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालय परिसरातील हत्येची ही थरारक घटना घडली आहे. घटनास्थळी पोलिसांना बंदूक आणि गोळी सापडली आहे.
पूर्णा शहरातील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या मैदानावर तोंडाला कपडा बांधून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी एका 22 वर्षीय तरुणाची पिस्तुलाने गोळ्या झाडून आणि तलवारीने सपासप वार करुन निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना शुक्रवारी दुपारी घडली असून यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेतील मयत तरुणाचे नाव आकाश गणेश कदम (वय 22 वर्षे रा.पूर्णा) असें आहे. त्या तरुणाचा खून नेमका कोणत्या कारणाने व कोणी केला हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
मयत तरुण हा शुक्रवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास आपल्या विना नंबरच्या दुचाकीवरून येथील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालय परिसरात आला होता.
त्याच्या पाठोपाठ दुसर्या एका विनानंबरच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तोडांला कापड बांधलेले दोघेजण आले.त्यांनी महाविद्यालय परिसरात मयत आकाशवर पिस्तूलातुन गोळ्या झाडल्या.
तेथे आकाशची दुचाकी पडलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर थोड्या अंतरावर मारेकर्यांंनी पाठलाग करत त्याच्यावर तलवारीने गळ्यावर, अंगावर, हातावर सपासप वार केले.
यातच आकाशचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती शहरात वा-यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.
माहिती मिळताच पूर्णा ठाण्याचे पो.नि. प्रदीप काकडे, सपोनि दर्शन शिंदे व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.
घटनास्थळी मारेकर्यांनी वापरलेली पिस्तूल, झाडलेल्या गोळीचे वेष्टण, विनानंबरची दुचाकी, चप्पल आदीं वस्तू आढळून आल्या आहेत.
त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून, अधिक तपासासाठी ठसेतज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण करण्यात आले. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आले आहे .
परभणीच्या पूर्णा शहरातील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालय परिसरात एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.
घटनास्थळी मिळालेल्या पिस्टल आणि बुलेट (गोळी)सापडल्यामुळे मयतावर तत्पूर्वी गोळीबार केला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.