वरिष्ठ भाजप नेत्याच्या वक्तव्याने फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्नचिन्ह
Senior BJP leader's statement questions Fadnavis' CM post

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात झाली असून प्रचारसभा, रोड शो आणि भाषणांमुळे दिवसोंदिवस या निवडणुकीला रंग चढत आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट संघर्ष महाराष्ट्रात होत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष असून सत्ताधारी भारतीय जनता पार्टी,
एकनाथ शिंदेंची शिवसेनेबरोबरच अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोन्ही गटांमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल
याबद्दल कोणतीही जाहीर घोषणा करण्यात आलेली नाही. अर्थात या मुद्द्यावरुन दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो.
मात्र आता मुख्यमंत्रिपदासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेत सूचक विधान केलं आहे.
महाराष्ट्रातून सध्या भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांचे तिन्ही महत्त्वाचे नेते या शर्यतीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाचा समावेश आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अनेकदा त्यांच्या पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार उद्धव ठाकरेच असल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेसने आधी जिंकून सत्ता मिळवू मग मुख्यमंत्री ठरवू अशी भूमिका घेतली आहे. असं असलं तरी काँग्रेसमधील नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी भावी मुख्यमंत्री
असे आपल्या लाडक्या नेत्यांचे पोस्टर्स झळकवल्याचं पाहायला मिळालं आहे. शरद पवारांच्या पक्षाने शरद पवार ठरवतील त्या व्यक्तीला आमचा पक्ष म्हणून पाठिंबा असेल असं जाहीर केलं आहे.
महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता 23 नोव्हेंबरच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसणार हे आताच सांगणं कठीण आहे. जागावाटप, निवडणुकीतील चूरस आणि बऱ्याच गोष्टींचा विचार केला तर
ही निवडणूक फारच रंजक ठरणार आहे. त्यामुळेच कोण मुख्यमंत्री होईल याचा आताच अंदाज बांधता येणार नाही. मात्र असं असतानाच भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल सूचक विधान केलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेत विनोद तावडेंना पत्रकारांनी, ‘2024 च्या निवडणुकींचे निकाल आणि भाजपाचा मुख्यमंत्री असं काही?’ असा प्रश्न विचारला.
त्यावर तावडेंनी, ‘महायुती जिंकेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल,’ असं उत्तर दिलं. त्यानंतर पत्रकारांनी, ‘तुमच्या नावाची चर्चा पण भरपूर होतेय,’ असं म्हणत विनोद तावडेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
हे वाक्य ऐकताच तावडेंनी, “भाजपामध्ये ज्या नावाची चर्चा होते ते कधी (मुख्यमंत्री) होत नाहीत हे पक्क लक्षात ठेवा. काही काळजीच करु नका,” असं म्हटलं. तावडे एवढ्यावरच थांबले नाही
तर त्यांनी भाजपाने नुकत्याच जिंकलेल्या तीन राज्यांचं उदाहरणंही दिली. “तुम्हाला राजस्थानचे भजनलाल माहिती होते? मोहन यादव (मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री) माहिती होते?
ओडिसाचे मुख्यमंत्री माहिती होते?” असा प्रश्न तावडेंनी पत्रकारांनी विचारला. त्यानंतर हसतच तावडे, “त्यामुळे माझ्या नावाची चर्चा झाली ना, तर मी नक्की नाही हे ठरवा. बाकी बघू,” असं म्हणत पुढल्या प्रश्नाकडे वळले.
तावडेंनी हे विधान स्वत: संदर्भात केलं असलं तरी राजकीय वर्तुळामध्ये त्यांचं हे विधान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढील काही आठवड्यांमध्ये अगदीच कोणालाही अपेक्षित नसणारा ट्विस्ट आणणार की काय अशी शंका घेण्यासाठी पुरेस ठरत आहे.