राहुल गांधीं मोदींना म्हणाले ‘पनौती’ त्यावर फडणवीस म्हणाले…..
Rahul Gandhi said 'Panauti' to Modi and Fadnavis said...

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या पराभवाला पंतप्रधान मोदी कारणीभूत असल्याचं सांगताना त्यांचा पनौती असा उल्लेख केला होता. त्यांच्या या विधानानंतर भाजपत संतापाची लाट उसळली आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या या विधानावर भाष्य केलं आहे. पुण्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेण्यासाठी काम करत आहेत. पण राहुल गांधींबाबत बोलायचं झाल्यास त्यांचा पक्षच त्यांना गांभीर्यानं घेत नाही, लोक त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत. तर मग मी त्यांना का गांभीर्यानं घ्यावं? अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी राजस्थानच्या जालोर इथं प्रचार सभेत बोलताना पंतप्रधानांवर निशाणा साधला होता.
यावेळी त्यांनी वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या पराभवावर भाष्य केलं. ते म्हणाले, “आपल्या टीमने विश्वचषक जिंकला असता परंतू ‘पनौती’मुळे आपण हरलो”
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रिलियाकडून पराभव झाला. यानंतर सोशल मीडियावर टीम इंडियाच्या सांत्वनाच्या पोस्ट पडत होत्या.
त्याचबरोबर पंतप्रधान मोदींना ट्रोल करणाऱ्या पोस्टही पडत होत्या. या ट्रोलिंगचाच आधार घेत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका करताना ‘पनौती’ हा शब्द प्रयोग केला.