प्रचारादरम्यान नांदेड जिह्यात लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला ?
Attack on Laxman Hake's car in Nanded district during campaign?
जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील यांच्या प्रचारासाठी ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके नांदेड जिल्ह्यातील कंधारच्या दौऱ्यावर होते.
मात्र या दौऱ्यादरम्यान त्यांच्या कारची गुरुवारी (7 नोव्हेंबर) तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झाले आहेत. या लोकांना विचाराची लढाई विचाराने लढता येत नाही.
हिंमत असेल तर समोर येऊन हल्ला करा, असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. सोबतच त्यांनी जोपर्यंत कंधार येथील पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात येणार नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
“साधारण 9 वाजेच्या सुमारास माझ्या गाडीवर हल्ला झाला. शंभर-दीडशे तरुणांनी येऊन आमच्या गाड्यांचा ताफा आडवला. आम्हाला वाटलं की ते ओबीसी तरूण असतील.
कारण गावा-गावात आमचं उत्स्फूर्त स्वागत होत आहे. पण त्यांच्या हातात काळे झेंडे होते. हातात काठ्या होत्या, त्यांनी तोंडाला पांढरे रुमाल बांधलेले होते. विशेष बाब म्हणजे पोलीस विभागाचे लोकही तिथे उपस्थित होते.
त्यामुळे हे षडयंत्र आहे. ओबीसीच्या माणसाने आरक्षणाच्या बाजूने बोलायचं नाही, ओबीसीच्या माणसाने निवडणूक लढवायची नाही. निवडणुकीचा अर्ज भरला तर प्रचार करायचा नाही,
प्रचाराला जात असेल तर हल्ला करायचा, असं सगळं महाराष्ट्रात चालू आहे. हा महाराष्ट्र आज मणिपूरच्या वाटेने वाटचाल करतोय,” असा हल्लाबोल हाके यांनी केला.
“आम्ही कंधारच्या पोलीस इन्स्पेक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी कंधारला जात आहोत. त्यासाठी हजारो ओबीसी बांधव त्या ठिकाणी जमा होणार आहे. जोपर्यंत त्या पीआयला निलंबित केलं जात नाही,
तोपर्यंत आम्ही त्या पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या मारणार आहोत. माझ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मी निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे,” असेही हाके यांनी सांगितले.
“घटनास्थळी पोलीस होते. पोलिसांना या घटनेची अगोदरच माहिती होती, तर त्यांनी प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही. पोलिसांच्या उपस्थितीत आमच्यावर हल्ला कसा होतो?
पोलिसांनी या सर्व प्रकाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केलेले आहे. त्यामुळे आमच्यावर झालेला हा हल्ला जीवघेणा होता. मला जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता, असं गंभीर आरोप हाके यांनीक केला.
.
तसेच, महाराष्ट्रात आमच्यावर कुठेही हल्ला होणार आहे, हे आम्ही गृहित धरलेलं आहे. ते समोर येऊन हल्ला करत नाहीत. आमनेसामने येत नाहीत.
तोंड बांधून मागून हल्ला करणारी यांची औलाद आहे. लढायचं असेल तर समोर या. विचारांची लढाई विचारांनी लढा. ही लोकशाही आहे. काठी आणि कुऱ्हाडीने लढावयाची ही लढाई नाही.
विचाराने विचाराचा सामना करायची ताकद नसल्यामुळे असे भेकडासारखे हल्ले केले जात आहेत. आम्ही आमचा प्रचार थांबवणार नाही. आम्ही आमच्या माणसांना एकत्र करू, असा इशाराही त्यांनी दिला.