नाना पटोले म्हणाले,देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील?
Nana Patole said, How will Devendra Fadnavis become Chief Minister?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मतदानासाठी अवघे १०-११ दिवस बाकी आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगतो आहे.
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत ३१ जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. या निवडणुकीत आमच्या १८० जागा आल्या तर
आश्चर्य वाटून घेऊ नका असं बाळासाहेब थोरात काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस निवडून येणार नाहीत असं म्हटलं आहे.
“नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात ‘एक है, तो सेफ है’ असं वक्तव्य केलं होतं. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीने असं वक्तव्य करणं हा लोकशाहीला एक प्रकारचा कलंक आहे.
नरेंद्र मोदी म्हणून ते हे विधान करू शकतात. मात्र देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने देशातील लोकांमध्ये विभाजन करण्याची मानसिकता निर्माण केली आहे.
देश विभागला गेलेला आहे. नरेंद्र देश हे सांभाळू शकत नाहीत, हे घाबरून गेले आहेत असं त्यांच्या विधानावरून दिसत आहे.” असं नाना पटोले म्हणाले. तसंच नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाष्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न नाना पटोलेंना विचारण्यात आला. तेव्हा नाना पटोले म्हणाले, “देवेंद्र फडणवीस कसे काय मुख्यमंत्री होतील कारण ते निवडून येणार नाहीत तसंच त्यांचा पक्षही निवडून येणार नाही.
मग ते कसे काय मुख्यमंत्री होतील?” असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं आहे. आता याबाबत भाजपाचे नेते किंवा देवेंद्र फडणवीस काही प्रतिक्रिया देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ओबीसी असल्यानेच आपल्यामागे ईडी लावली आणि तुरुंगात टाकल्याचा आरोप छगन भुजबळांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, देशामध्ये हिटलरशाही आहे.
त्यामुळे छगन भुजबळ यांनी खरं सांगितलं हे त्यांच्याच आघाडीतले लोक म्हणत असतील. ज्या नवाब मलिक यांना दाऊदचा साथीदार म्हणून जेलमध्ये टाकलं,
तेच आज महायुतीचे उमेदवार आहेत. भाजपाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यामुळे भाजपचा खरा चेहरा आता महाराष्ट्राला दिसतो आहे असंही नाना पटोले म्हणाले.