निलंबित नेते भडकले म्हणाले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,वरिष्ठ नेते पक्ष संपवायला निघाले
The suspended leader said that the state president of the Congress, the senior leaders are going to end the party
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसनं बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली आहे. बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
काँग्रेसने आतापर्यंत एकूण 28 काँग्रेस बंडखोरांची हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून पक्षानं बंडखोरांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.
यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक , काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार ,
पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
दरम्यान, याच मुद्यावरून सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि काही वरिष्ठ नेते पक्ष संपवायला निघालेले आहेत असा आरोप निलंबनाची कारवाई करण्यात आलेले पुण्यातील बंडखोर उमेदवार आबा बागुल यांनी केलाय.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिला होता. आपण अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी साधा फोनही केला नाही. असा दावा बागुल यांनी केलाय.
निलंबनाची कारवाई करताना पक्षाच्या घटनेनुसार आपली बाजू ऐकून घेण आवश्यक असतं. असं असताना आपल्या विरोधात षडयंत्र रचून निष्ठावंत कार्यकर्त्याला संपवण्याचा प्रकार पक्षामध्ये सुरू असल्याचा गंभीर आरोप
आबा बागुल यांनी केलाय. प्रचारादरम्यान फूड पॉइजनिंग झाल्यामुळे बागुल यांना सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय. असं असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निलंबनाच्या कारवाईबाबत भूमिका मांडली.