मनोज जरांगेनी परभणीत घेतली सोमनाथ सूर्यवंशीं,वाकोडेंच्या कुटुंबियांची ;काय म्हणाले जरांगे ?
Manoj Jarange took Somnath Suryavanshi, Vakode's family to Parbhani; what did Jarange say?
आज परभणीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
“मी इथे भाषण करायला नाही आलो आणि मी भाषणही करत नाही. मी गरीब असल्याने मला त्यांचे दुःख कळते. त्यांच्या आईने सांगितले की पोलिसांनी अमानुष मारहाण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींना पाठीशी घालू नये.
या घटनेला जातीने पाहू नका. मी मंत्र्यांना सांगतो की कुटुंबाच्या सर्व मागण्या तातडीने मान्य करा. मी सुर्यवंशी कुटुंबासोबत आहे”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू मारहाणीत झाला, अशी माहिती रिपोर्टमध्ये आहे. पण गृहमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे की कुटुंबियांना न्याय देणे.
सगळ्या मागण्या मान्य करेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. मी शब्द दिल्यानंतर मागे हटत नाही. पण कुटुंबाला न्याय देणे गरजेचे आहे”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
“जर सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय दिला नाही तर यांना रस्त्यावरची काय लढाई आहे हे आपण दाखवून देऊ. त्यांच्या दुःखाची जाणीव आम्हाला आहे. या राज्याची जनता एकच आहे.
मग आता प्रश्न कसा सोडवत नाही, हे आपण पाहू. आपण एक जीवाने या कुटुंबाच्या मागे उभे राहू. मुख्यमंत्र्यांना जो डबल तपास करायचे तो करा, मात्र एकही आरोपी सुटता कामा नये”, असे मनोज जरांगे म्हणाले.
“तुम्हाला तपास लागत नसला तरी जनता तपास करेल. इतका निर्घृणपणे खून कोणाचाही झालेला नाही. मी जे बोलतो ते करतो. मुख्यमंत्री आणि
गृहमंत्री म्हणून जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असाल म्हणजे जीव गेला. त्याला न्याय कधीच मिळणार नाही. आरोपीला अटक होणार नाही का?” असे अनेक प्रश्न मनोज जरांगेंनी उपस्थितीत केले.
“बीड हत्या प्रकरणी सरकार आरोपींना वाचवत आहे. बीडमधील सर्व प्रकरण बाहेर काढणार आहे. संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येमागचा एकही गुन्हेगार सुटला नाही पाहिजे”, असेही मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी अनेक आंदोलनकर्त्यांनी नेमकं काय घडलं? याबद्दलची माहिती दिली. सोमनाथ सूर्यवंशी विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्या.
तसेच पोलिसांना कठोर शिक्षा द्या. पोलीस लाठीचार्जमध्ये महिलांना झालेल्या मारहाण केल्याचे फोटो दाखवण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटलांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अभिवादन करण्यात आले आहे.
आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. विजय वाकोडे आंबेडकर चळवळीचे नेते होते. त्यांचा 16 डिसेंबरला हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.
वाकोडे परभणीत संविधान विटंबना नंतर झालेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. मनोज जरांगे यांनी विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
यावेळी वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी देखील मनोज जरांगे यांच्यासोबत संवाद साधला.
“माझे वडील शांततेचं अपील करत असताना माझ्या वडिलांना एक नंबरचा आरोपी केले. माझ्या वडिलांनी 40 वर्षे समाजाचं काम केलं.
परभणीचे दोन्ही प्रकरण आपण लावून धरू”, असं विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे मनोज जरांगे यांना म्हणाले. यावेळी एक कार्यकर्ता देखील मनोज जरांगे यांच्याकडे आपली भावना बोलू लागला.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले परभणी, बीड पर्यटन क्षेत्र झाले आहे. मुख्यमंत्र्यापर्यंत पूर्ण माहिती दिलेली आहे. घटनेनंतर वेगळं वळण देण्यात आलं. संविधान विटंबना प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही.
तुम्ही आणि राहुल गांधी येऊन गेल्यानंतर इतर समाजामध्ये चांगला मेसेज गेला. शहिदांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं जात आहे. तर ते त्यांना पर्यटन वाटत आहे”, अशी भावना एका कार्यकर्त्याने मनोज जरांगे यांच्याकडे मांडली.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांची मते जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी आपण परभणीचे दोन्ही प्रकरणं लावून धरू, असं आश्वासन दिलं.
यानंतर मनोज जरांगे पाटील बीडच्या मस्साजोग गावच्या दिशेला रवाना झाले. याआधी मनोज जरांगे यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट दिली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.