दादांनी राष्ट्रवादीमध्ये मोठी खदखद; मंत्री नाराज, कारण घडले काय?
Dada caused a big stir among the NCP; Minister is upset, what happened?

शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही पालकमंत्रिपदावरुन खदखद पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या १० पैकी ८ मंत्र्यांना स्वजिल्हे मिळालेले नाहीत.
त्यामुळे पालकमंत्रिपद मिळालेल्या जिल्ह्यांचा कारभार कसा करायचा, असा प्रश्न मंत्र्यांना पडला आहे. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्वत:पुरता, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी लेकीपुरता विचार केला.
पण बाकीच्या मंत्र्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री खासगीत विचारत आहेत. त्यामुळे सेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीत धुसफूस पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीच्या १० पैकी ८ मंत्र्यांना स्वजिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालेलं नाही. भाजपच्या २० पैकी ७, तर शिवसेनेच्या १२ पैकी ७ मंत्र्यांना स्वजिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालेलं आहे.
त्यामुळे पालकमंत्रिपदाचं वाटप होताना राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक तडजोड करावी लागल्याचं चित्र आहे. या कारणामुळे मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मंत्र्यांची नाराजी उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर आहे.
पालकमंत्रिपद वाटपात अजित पवारांना त्यांचा पुणे जिल्हा मिळाला. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कन्या अदिती तटकरेंना त्यांचा रायगड जिल्हा मिळाला. पण शिवसेनेनं विरोध केल्यानं तटकरेंच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली आहे.
अजित पवार, अदिती तटकरेंचा अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य कोणत्याही मंत्र्याला स्वजिल्हा मिळालेला नाही. त्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे.
एखाद्या मंत्र्याला त्याच्याच जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळाल्यास काम करणं सोपं जातं. पण अनेक जिल्ह्यांना मंत्रिपदच नाही, तर काही जिल्ह्यांमध्ये अनेक मंत्री अशी स्थिती आहे.
त्यामुळे अनेक मंत्र्यांना स्वजिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालेलं नाही. त्याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला आहे. आज पक्षाच्या मंत्र्यांची देवगिरी बंगल्यावर आठवडा बैठक होत आहे. त्यात या सगळ्याचे पडसाद उमटू शकतात.
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूरचे आहेत. त्यांना वाशिमचं पालकमंत्रिपद मिळालं आहे. दोन जिल्ह्यांमधलं अंतर तब्बल ६२५ किलोमीटर आहे.
नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना नंदूरबारचं पालकमंत्रिपद मिळालेलं आहे. दोन जिल्ह्यातलं अंतर ५२४ किलोमीटर आहे. साताऱ्याच्या मकरंद पाटील यांना बुलढाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं आहे.
दोन जिल्हे एकमेकांपासून ४४० किलोमीटर आहे. मतदारसंघात कधी काम करायचं, मुंबईत कधी जायचं आणि पालकमंत्रिपद मिळालेल्या जिल्ह्यांमध्ये कधी जायचं, असे प्रश्न राष्ट्रवादीचे मंत्री विचारत आहेत.