मोठ्या नेत्याचा दावा शरद पवार, ठाकरे मोदींसोबत सत्तेत जातील
Big leader claims Sharad Pawar, Thackeray will come to power with Modi

महायुतीसोबत राहिलेले आणि ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फरकत घेणारे माजी मंत्री बच्चू कडू यांनी एक मोठा दावा केला आहे. येत्या काळात केंद्रामध्ये मोठ्या घडामोडी होतील असं कडू यांनी म्हटलं आहे.
या घडामोडींमध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारमध्ये सत्तेत जाताना दिसतील, अशी शक्यताही कडू यांनी व्यक्त केली आहे.
ही शक्यता व्यक्त करताना कडू यांनी केंद्रामध्ये सत्तेत असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचाही उल्लेख केला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये ‘अब की बार 400 पार’ची घोषणा देणाऱ्या भाजपा आणि मित्र पक्षांना मनासारखं यश मिळवता आलं नाही.
त्यामुळेच भाजपा आणि मित्र पक्षांना केंद्रात सत्ता स्थापन करुन नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची हॅटट्रीक करण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंची मदत घ्यावी लागली.
याचाच संदर्भ कडू यांनी आपल्या विधानामध्ये दिला आहे. “नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे त्यांची बील पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत.
ते गेल्यानंतर भाजप पुढची रणनीती आखत आहे. शरद पवार आणि ठाकरे यांच्या खासदारांची संख्या त्यासाठी पुरेशी आहे,” असं कडू यांनी म्हटलं आहे.
कडू यांनी आपलं म्हणणं मांडताना ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांचाही उल्लेख केला आहे.
“खासदार संजय राऊत यांची वक्तव्य सुद्धा बदलू लागली आहेत. आपले खासदार आमदार पक्ष सोडून जाऊ नयेत यासाठी राऊत यांचा प्रयत्न सुरू आहे,” असं कडू यांनी म्हटलं आहे.
बच्चू कडू यांनी दोन्ही विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा उल्लेख करताना या दोन्ही नेत्यांची गरज भाजपासाठी संपल्याचा दावा केला आहे.
“एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गरज भाजपासाठी संपलेली आहे. मोगल निती सध्या सुरू आहे. आपल्यापासून लांब चालला की त्याला कापायचा असे हे मुघलांचे बच्चे आहेत,” असं म्हणत कडू यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
‘एक रुपयात विमा’ योजना बंद करण्याच्या मुद्द्यावरुन निशाणा साधताना, “राज्यात आलेले सरकार भ्रष्ट मार्गाने आले आहे म्हणून मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे,” असा टोला कडूंनी कृषीमंत्री कोकाटे यांना लगावला आहे.