चक्क संजय राऊतांनी शरद पवारांनाच सुनावले खडेबोल ;काय घडले कारण ?
Sanjay Raut even gave a harsh speech to Sharad Pawar; what happened and why?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत मराठा पातशाहीचे धुरंधर नेतृत्व महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. विशेषतः महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. आज सकाळच्या पत्र परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार, एकनाथ शिंदे आणि भाजप यांना खडेबोल सुनावत महाराष्ट्र धर्माची आठवण करून दिली. त्यावरून राज्यात पुन्हा शाब्दिक युद्ध रंगण्याची चिन्हं आहेत.
यावेळी संजय राऊत यांनी दिल्लीतील शिंदेंच्या सत्कार सोहळ्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार नाही तर त्यांनी जणू अमित शाह यांचा सत्कार केला आहे,
असे आम्ही मानतो. हा महाराष्ट्र तोडणाऱ्या शाहांचा सत्कार आहे, असा घणाघात राऊतांनी केला. त्यांनी शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जायला नको होते, त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावायला नको होती, अशी जाहीर नाराजी व्यक्त केली.
शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाह यांच्या सहकार्याने फोडली.
महाराष्ट्राशी गद्दारी केली. त्या एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रमाला पवारांनी जायला नको होतं. यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील.
आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण काय आहे हे माहिती नाही. पण आम्हालाही दिल्लीतील राजकारण कळतं पवार साहेब, असा घणाघात राऊतांनी घातला.
कोण,कोण कोणाला टोप्या घालतंय आणि टोप्या उडवतंय हेच काही कळेनास झालं आहे. कोण गुगली टाकतंय हे कळत नाही. गद्दारांना असे सन्मान देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का असल्याचे राऊत म्हणाले.
दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रमात शरद पवार गेल्याने, संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली. यामुळे या सत्कार सोहळ्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांनी या सोहळ्याला जाणे टाळायला हवे होते, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या विधानाने राज्यातील राजकारण पेटले आहे. शिंदे गटासह राष्ट्रवादीतील नेत्यांनी राऊतांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. त्याचं कोडकौतुक केलं. त्याचवेळी शरद पवार यांनी टाकलेली गुगली भल्याभल्यांना कळत नाही, असे वक्तव्य केले. तर आज संजय राऊत यांनी जी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शिंदे यांचे पवार यांच्याविषयीचे वक्तव्य चर्चेत आले आहे.
हेच संजय राऊत पूर्वी काय म्हणायचे. पवार साहेबांसारखा नेता राज्याला देशाला मिळाला हे भाग्य आहे. महाराष्ट्राचा सुपुत्राचा सत्कार काल झाला आणि महाराष्ट्राच्या सुपुत्राने केला. पवार साहेबांनी काय करायला पाहिजे काय नको हे सांगण्याइतके संजय राऊत मोठे नाही, असा टोला मंत्री शंभुराज देसाई यांनी लगावला.
संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. एकनाथ शिंदेनी जे काही काम केलं, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी शिंदेना मिळाली आणि त्यानी ते सिद्ध केलं आहे.
सध्या राऊत हे बरळत असल्याचा टोला त्यांनी लगावला. जर राऊतांना इतके वाटत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे आवाहन त्यांनी केले. त्यांना माहिती आहे की, महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास राज्यात त्यांची काय अवस्था होईल, असा टोला त्यांनी लगावला.
ठाण्याचा विकास कोणी केला हे जनतेने दाखवून दिले आहे. शिवसेनेची स्थापना झाली, ती वाढली त्यावेळी संजय राऊत हे शिवसेनेत नव्हते. त्यांनी यासंदर्भात बोलू नये. ते दुतोंडी सापासारखे आहेत, अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली. शरद पवार यांनी काय करावं आणि काय नाही, हे जर संजय राऊत ठरवायला लागले तर याचा राष्ट्रवादीने विचार करावा असे ते म्हणाले.
शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया आली आहे. “अशी टीका करणं हे दुर्देवी आहे. उलट आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्राच्या संस्कृत राजकारणाची परंपरा स्टेटसमनशीप जपली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतय. पवारसाहेब या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत” असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
“मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होत असताना केवळ एकनाथ शिंदे साहेबच नाही आणि 14 ते 15 जणांचा सत्कार या कार्यक्रमात होता. कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांस्कृतिक गोष्टी पहायला पाहिजेत असं मला वाटतं” असं अमोल कोल्हे म्हणाले.
“राऊतसाहेबांना इतकं दु:ख झालं असेल, तर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख केला, उद्धव ठाकरे सुद्धा अजित पवारांना भेटले, आपण याला स्टेटसमनशिप म्हणून बघूया. प्रत्येकवेळी राजकारण आणलं तर अवघड होईल” असं अमोल कोल्हे म्हणाले.
“तुमचं दिल्लीतील राजकारण वेगळं असेल, आम्हालाही राजकारण कळतं पवारसाहेब असं संजय राऊत म्हणालेत” त्यावर अमोल कोल्हे म्हणाले की, “हे उगाचच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारखं आहे.
पवारसाहेबांच्या राजकारणाविषयी बोलण्याची फार कमी जणांची उंची आहे. शरद पवारांना किती राजकारण कळतं हे कुणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की, राजकारणात सुसंस्कृतपणा जपला पाहिजे”