मुंबईतील घटना; साधा क्लर्क ते मॅनेजर आणि बँकेचे केले 122 कोटीं स्वाहा
Incident in Mumbai; From a simple clerk to a manager, the bank was robbed of Rs 122 crores

मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत 122 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक हितेश मेहताने बँकेच्या तिजोरीतून मोठी रक्कम खिशात घातल्याचं समोर आलं आहे.
आरोपी हितेश मेहताने प्रभादेवीच्या कार्यालयातून 112 कोटी तर गोरेगावच्या कार्यालयातून 10 कोटी गायब केले आहेत. अशातच हितेश मेहता याने बँक कशी लुटली? याचा खुलासा पोलीस तपासात केला आहे. सध्या हितेश मेहता आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे.
आरबीआयचे डेप्युटी जीएम रवींद्रन आणि आणखी एक अधिकारी संजय कुमार ऑडिटसाठी आले असताना महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
बँकेचे मुख्य तिजोरीचे लॉकर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होते. आरबीआय अधिकाऱ्यांनी न्यू इंडिया बँकेचे कर्मचारी अतुल म्हात्रे यांच्याकडून लॉकरच्या चाव्या घेतल्या आणि तिजोरीत ठेवलेली रोकड मोजण्यास सुरुवात केली.
त्यानंतर बँकेत घोटाळा झाल्याचं समोर आलं. हितेश मेहताने आरबीआय अधिकाऱ्यांची खाजगी भेट घेतली. यानंतर बँकेच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं.
बँक लॉकरमध्ये ठेवलेली रोकड आणि रजिस्टरमध्ये नोंदवलेल्या रोकडमध्ये खूप फरक असल्याचं दिसताच हितेश मेहताने रोख रक्कम हडप केल्याची कबुली दिली.
वाणिज्य पदवीधर असलेले आरोपी हितेश मेहता 1987 मध्ये बँकेत क्लार्क म्हणून रुजू झाला होता आणि 2002 मध्ये त्याची जनरल मॅनेजर
आणि अकाउंट्स प्रमुख म्हणून पदोन्नती झाली होती. त्यानंतर त्याने रिटायरमेंटच्या अखेरच्या टप्प्यात बँकेच्या लॉकरमधून पैसे उकळले, असं पोलिसांच्या सुत्रांनी सांगितलं आहे.
कोविड काळापासून हितेश मेहता बँकेतून हळूहळू पैसे काढत होता. त्याने इतके पैसे काढले की, त्याला पैशांचा काय करावं कळत नव्हतं. त्यावेळी त्याने आपल्या नातेवाईकांकडे पैसे ठेवण्यासाठी दिले.
त्यांना कमिशन देऊन पैशांच्या व्यवहार करण्यास सुरूवात केली. मात्र, ऑडिटच्या वेळी हितेश मेहता चांगलाच जाळ्यात अडकला.
दरम्यान, ईओडब्ल्यू टीमने दहिसर येथील हितेश मेहताच्या घरावर छापा टाकला आणि आरोपी मेहताला अटक केली. आता पोलीस या घोटाळ्याचा सखोल तपास करत आहेत
आणि 122 कोटी रुपये कुठं गेलं आणि यात आणखी कोण कोण सामील आहे? हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून आणखी कोण सामील आहे, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.