18 कोटीं वरून अभिनेत्री प्रीती झिंटा काँग्रेस पक्षावर भडकली

Actress Preity Zinta lashes out at Congress party over Rs 18 crore

 

 

 

प्रसिद्ध अभिनेत्री आणि इंडियन प्रिमिअर लीगमधील पंजाब इलेव्हन्स संघाची मालकीण प्रिती झिंटा काँग्रेसवर प्रचंड संतापली आहे.

 

प्रितीने थेट आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. प्रितीने काँग्रेसकडून खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं म्हणत टीका केली आहे.

 

केरळ काँग्रेसच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये सध्या आरबीआयने निर्बंध आणलेल्या न्यू इंडियन सहकारी बँकेने प्रिती झिंटा आणि इतर काही लोकांचं 18 कोटींचं कर्ज माफ केल्याचा दावा करण्यात आलेला.

 

“तिने तिची सोशल मिडिया अकाऊंट्स भाजपाकडे सोपवली आणि तिचं 18 कोटींचं कर्ज माफ करण्यात आलं. मागील आठवड्यात या बँकेचं दिवाळं निघालं. बँकेचे खातेदार त्यांच्या पैशांसाठी रस्त्यावर आलेत,” असं केरळ काँग्रेसने ही पोस्ट करताना म्हटलं होतं.

 

या पोस्टवरुन प्रिती चांगलीच संतापली असून ही पोस्ट कोट करुन रिट्वीट करत तिने आपली संतापजनक प्रतिक्रिया नोंदवली आहे.

 

“नाही, मी स्वत: माझी सोशल मिडिया अकाऊंट्स हाताळते. तसेच खोट्या बातम्या पसरवताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. माझं कोणतंही कर्ज माफ झालेलं नाही.

 

मला धक्का बसला आहे की एक राजकीय पक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी अशाप्रकारे खोट्या बातम्या पसरवतात किंवा माझ्या नावाचा वापर करुन अशा नाक्यावरच्या गप्पा वाटाव्यात अशा गोष्टी शेअर करतात.

 

तुमच्या माहितीसाठी सांगते की सर्व कर्जाची परतफेड केली आहे. दहा वर्षांपूर्वीच सर्व कर्ज फेडलं आहे. यामधून तुम्हाला काय हवं ते स्पष्टीकरण मिळालं असेल आणि भविष्यात यामधून गैरसमज निर्माण होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करते,” असं प्रितीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

दरम्यान, दुसरीकडे न्यू इंडियन सहकारी बँकेच्या ग्राहकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलासा दिला आहे. या बँकेमध्ये खातं असलेल्यांना आपल्या खात्यातून 25 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे.

 

बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्याची बातमी समोर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी या बँकेच्या शाखांबाहेर ग्राहकांनी गर्दी केली होती. आपल्याला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती,

 

असं अनेक ग्राहकांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. तसेच अनेकांनी आपली वेगवेगळी कामं बँकेत पैसे अडकून असल्याने अडून पडल्याचंही सांगितलं होतं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *