मराठीवरून डी-मार्टमध्ये तुफान राडा
Storm in DMart from Marathi

केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही मराठी भाषेला हाल सोसावे लागत असल्याच्या अनेक घटना मागील काही काळामध्ये अधोरेखित झाल्याचं दिसून आलं आहे.
महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास परप्रांतीय व्यक्तींकडून नकार दिल्याच्या मुद्यावरून मागील काही महिन्यांमध्ये अनेकदा वाद देखील झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या एअरटेल गॅलरीतील महिला कर्मचाऱ्याने मराठी बोलण्यास नकार देत आरेरावीची भाषा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हे प्रकरण कुठे शांत होत नाही तोच आता असाच प्रकार अंधेरीमधील डी-मार्टमध्ये घडला आहे.
मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील डी मार्ट मधील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये देखील मराठीच्या मुद्द्यावरून वाद झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
डी मार्ट कर्मचाऱ्याला मराठीमध्ये बोलण्याची विनंती ग्राहकाने केली असता त्याने उद्धट उत्तर देत ग्राहकाला, “मी मराठी बोलणार नाही, हिंदीतच बोलणार” असे म्हटल्याने वाद झाला.
ग्राहक आणि कर्मचाऱ्यामधील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये डी-मार्टमधील कर्मचारी मुजोरपणे, ‘मी मराठीत बोलणार नाही, तुला काय करायचं ते कर’ असं ग्राहकाला सांगताना दिसत आहे.
मराठीत बोला असं डी-मार्टच्या कर्मचाऱ्याला ग्राहकाने सांगितल्यानंतर त्याने हिंदीमध्ये, “तुला त्रास काय आहे?” असा प्रश्न केला. यावर, “काय त्रास आहे म्हणजे काय?” असा सवाल ग्राहकाने केला.
त्यावरुन या कर्मचाऱ्याने उद्धटपणे, “नही आता मेरे को मराठी, क्या करेगा?” असा उर्मट सवाल विचारला. त्यानंतरही हा कर्मचारी मराठी येत नाही तर तुम्ही माझं काय वाकडं करणार असा अर्थाचे सवाल ग्राहकांना विचारताना दिसला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादामध्ये उडी घेतल्यामुळे प्रकरण चिघळले आहे.
वर्सोव्याचे मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी अंधेरीमधील या डी-मार्टमध्ये जाऊन ग्राहकांना मराठीवरुन उद्धट उत्तर देणाऱ्या तरुणाला मारहाण केली.
महाराष्ट्रात रहायचं तर मराठी बोलावं लागेल, असं या तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांना खडसावून सांगितलं. तसेच या कर्मचाऱ्याला कान पकडून मराठी माणूस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागण्यास मनसैनिकांनी भाग पाडले.
काही आठवड्यांपूर्वीच कांदिवलीतील चारकोपमधील एअरटेल कस्टमर केअरच्या गॅलरी येथे काम करणाऱ्या महिला कर्मचारीने मराठीत बोलण्यास नकार देत मराठी तरुणाशी उद्धट वर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
अनेकांनी यावर संताप व्यक्त केला. या प्रकरणी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता एअरटेल प्रशासन आणि संबंधित महिला कर्मचारीने या प्रकारावर माफी मागितली आहे.
याचप्रमाणे साताऱ्यातील एका बँकेत कर्मचाऱ्याने मराठी बोलणाऱ्या वृद्धांबरोबर गैरवर्तणूक करत असल्याचे आरोप झाल्याचं दिसून आलं होतं.
काही दिवसांपूर्वीच पुण्यातील वाघोली येथील डी-मार्टमध्येही “हिंदी ही बोलेंगे (आम्ही हिंदी भाषेतच बोलणार!)” असं सांगत एका व्यक्तीने मराठीला विरोध केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.