एकाला वाचवण्यासाठी विहिरीत ७ जणांनी घेतल्या उड्या, सर्वच्या सर्व आठ जणांचा मृत्यू
7 people jumped into a well to save one person, all eight died

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील एका विहिरीत पडलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेल्या आठ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विहिरीत पडलेल्या एकाचा जीव वाचावा यासाठी एकापाठोपाठ एक असे हे सर्वजण विहिरीत उतरले होते. पण त्यांच्यापैकी कोणीच परत आले नाही.
बचावकर्ते त्यांच्यापर्यंत पोहचण्याच्या आधीच हे सर्वजण चिखलात मृतावस्थेत पडलेले होते. दरम्यान या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेशातील कोंडावत गावात गंगौर उत्सव साजरा केला जात होता. मात्र एकाच वेळी आठ जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. मृत्युमुखी पडलेले आठही जण गंगौर विसर्जनासाठी विहीर स्वच्छ करत असताना ही घटना घडली आहे.
कोंडावत हे गाव इंदुरपासून १२० किमी दक्षिणेला आणि जिल्ह्याच्या ठिकाणापासून १५ किमी अंतरावर आहे. “दोरी तुटल्याने दुपारी तरुण विहिरीत पडला.
तो चिखलात बुडाला आणि वर आला नाही. हे पाहून एक एक करून सात गावकऱ्यांनी एकमेकांना वाचवण्यासाठी विहिरीत उड्या घेतल्या पण त्यांचा मृत्यू झाला.
विहीरीत तयार झालेल्या विषारी वायूमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे,” असे कोंढवाचे पोलीस अधीक्षक मनोज राय यानी सांगितले.
गावकऱ्यांनी या घटनेबद्दल प्रशासनाला माहिती दिली आणि १०० जणांच्या बचाव पथक कोंडावत रवाना झाले. मात्र चिखलात बुडालेल्या तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी एसडीईआरएफच्या पंधरा जवांनांना अनेक तास संघर्ष करावा लागला.
दरम्यान मृतांची ओळख पटली असून राकेश, वासुदेव, अर्जुन, गजानंद, मोहन, अजय, शरण आणि अनिल अशी त्यांची नावे आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी खांडवा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
घटनेच्या प्राथमिक तपासात दिसून आले की गावातील एक ड्रेनेज विहीरीत सोडण्यात आले आहे. यामुळे विहीरीत चिखल झाला आहे. विहिरीत सोडलेल्या दूषित पाण्यामुळे विषारी वायू तयार झाल्याचे सांगितले जात आहे.
“या विहिरीचा वापर फक्त उत्सवांमध्ये मूर्ती विसर्जनासाठी केला जात असे. पिण्याच्या पाण्यासाठी तिचा वापर केला जात नव्हता,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. जिल्हाधिकारी ऋषव गुप्ता यांनी प्रत्येक पीडिताच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत दिली जाईल अशी माहिती देखील दिली आहे.