बीड मध्यवर्ती कारागृहात वाल्मिक कराडला पॅनिक अटॅक
Valmik Karad suffers panic attack in Beed Central Jail

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. सीआयडीने त्याच्या विरोधात सबळ पुरावे दाखल केले आहेत.
तो गेल्या काही दिवसांपासून कारगृहात आहे. आपला याप्रकरणात काहीच संबंध नसल्याचा कांगावा करत त्याने न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे. दरम्यान वाल्मिकला तुरुंगातच पॅनिक अटॅक आला.
त्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. यापूर्वी सुद्धा प्रकृतीच्या कुरबुरीवरून त्याला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले होते.
पण त्या ठिकाणी त्याची मोठी बडदास्त ठेवल्याचे दिसून आले होते. तर तुरुंगातही त्याच्या दिमतीला प्रशासनातील कर्मचारी आणि इतर लोकांना ठेवण्यात आल्याचे समोर आले होते.
वाल्मिक कराडला दुपारच्या वेळी अस्वस्थ वाटू लागलं. त्याची प्रकृती अचानक बिघडली. कारागृहात गेल्यापासून कराडच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.
त्याला पॅनिक अटॅक आल्याचे निदान करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले.
वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्यानंतर तुरुंग प्रशासनाने तातडीने डॉक्टरांना बोलावले. त्यांनी कराडची तपासणी केली असता त्याला पॅनिक अटॅक आल्याचे समोर आले.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याला रक्त तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचा रक्त नमुना अहवाल आल्यानंतर त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे.
कारागृहात वाल्मिकची खास बडदास्त ठेवल्याचे समोर आले होते. त्याचे प्रशासकीय यंत्रणेत चांगलेची ओळख असल्याचे या निमित्ताने उघड झाले. अनेक अधिकारी जणू त्याच्या दिमतीला लागले होते.
याविषयीची तक्रार करण्यात आली होती. चौकशीअंती तुरुंगातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह एका महिला शिपायाला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्याची मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली आहे. याप्रकरणातील आरोपी कराड हा तुरुंगात गेल्यापासून त्याच्या प्रकृतीच्या तक्रारी सातत्याने वाढत असल्याची चर्चा होत आहे.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. हे प्रकरण नंतर चांगलेच गाजले. या हत्येनंतर बीडमधील गुंडाराजचे एकापेक्षा एक धक्कादायक अशी प्रकरणं समोर आली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा प्रमुख आरोपी असून सध्या तो बीडच्या तुरुंगात आहे. दरम्यान, तो ज्या तुरुंगात आहे, त्याच तुरुंगाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे.
कराड असलेल्या कारागृहातील वरिष्ठ तुरूंग अधिकाऱ्याला आणि एका महिला शिपायाला निलंबित करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड ज्या तुरुंगात आहे, त्याच तुरुंगाचे वरिष्ट अधिकारी डी. डी. कवाळे आणि महिला शिपाई सीमा गोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ही कारवाई करत असताना त्यांच्यावर मोठा ठपका ठेवण्यात आला आहे. रक्ताच्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतर लोकांना कैद्यांना भेटू दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
तसेच कारागृहात अनेक त्रुट्या आढळून आल्यानेही ही कारवाई करण्यात आली आहे. कवाळे नामक अधिकाऱ्यांकडे दीड महिन्यांपूर्वी बीड कारागृहाचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता.
यादरम्यान कारागृह महासंचालक कार्यालयातील एका पथकाने बीड कारागृहाची तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान अनेक त्रुट्या आढळून आल्या होत्या. त्यामुळेच पुणे येथील अपर पोलीस महासंचालकांना ही मोठी कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून याच कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिली जात होती, असा वारंवार आरोप होत होता. एकीकडे हा आरोप होत असतानाच या तुरुंगातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे आणि महिला शिपायाचे निलंबन करण्यात आले आहे.
त्यामुळे नातेवाईकांव्यतिरिक्त इतर लोकांना भेटू दिलेला ‘तो’ कैदी नेमका कोण? आहे, याबाबत विचारले जात आहे.
गेल्या अनेक वर्षापासून कारागृहातील अधिकाऱ्यांचे निलंबन झालेले नाही. असे असताना बीडच्या तुरुंगाबाबत करण्यात आलेल्या कारवाईला चांगलेच महत्त्व प्राप्त झालेले आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगांत ठेवावं अशी मागणी केली जात आहे.
बीडच्या तुरुंग प्रशासनाबाबत अनेक तक्रारी निश्चितच आहेत. याबाबतचे काही पुरावे हाती येत आहेत. त्यानंतर आम्ही पुराव्यासहित तक्रार करू, असं सुरेश धस यांनी म्हटलंय.
तसेच संतोष देशमुख यांच्या खून्यांना एका जागेवर ठेवू नये ही मागणी आम्ही करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे आता तुरुंग अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.