भाजपचे ७५ नेते रविवारी पुण्यात उमेदवारांची होणार चाचपणी
75 BJP leaders will test the candidates in Pune on Sunday
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील प्रमुख ७० नेत्यांची बैठक येत्या रविवारी (सात जानेवारी) पुण्यात होत आहे. यामध्ये भाजपकडून लढविल्या जाणाऱ्या संभाव्य २३ ते २५ जागांवर मंथन होणार असल्याची चर्चा आहे.
भाजपकडून पुण्यातील बैठक ही संघटनात्मक पातळीवरील असल्याचे सांगण्या येत असले, तरी यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीवर सविस्तर चर्चा झडेल, असा दावा उच्चपदस्थ सूत्रांकडून करण्यात आला आहे.
राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून, भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सत्तेत आहे.
राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी भाजपकडून २३ ते २५ जागा लढविल्या जाण्याची शक्यता आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील किमान सात जागांचा समावेश आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये लोकसभेच्या दहा जागा आहेत. त्यामध्ये कोल्हापूर किंवा हातकणंगले यापैकी एक जागा भाजपला मिळेल. सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील चारही जागा भाजप लढवेल, असे चित्र आहे.
याशिवाय पुण्यातील पुणे आणि बारामती ही भाजपकडे, तर शिरूर आणि मावळ अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना लढवेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर या सर्व जागांवरील संभाव्य उमेदवारांसह या ठिकाणची निवडणूक तयारीचा एक प्रकारे आढावा या बैठकीत घेतला जाईल, असा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांपैकी एक जागा भाजपकडे, तर दुसरी जागा शिवसेनेकडे आहे. नगरमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे खासदार म्हणून निवडून आले आहेत.
त्यामुळे नगर जिल्ह्याची जबाबदारी विखे पाटील यांच्यावर असणार असून, या ठिकाणच्या दोन्ही जागांबाबत सविस्तर चर्चा अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.
पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक झालेली नाही आणि ही जागा वर्षभरापासून रिक्त आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला चपराकही लगावली आहे.
पुण्यात भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी अर्धा डझनहून अधिक जण इच्छुक आहेत. प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,
माजी आमदार जगदीश मुळीक, भाजपचे नेते सुनील देवधर, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी खासदार संजय काकडे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याही नावांची चर्चा आहे.
याशिवाय ऐन वेळी आमदार माधुरी मिसाळ यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, अशीही कुजबूज आहे. त्यातच गिरीश बापट यांच्या कुटुंबाचा विचार झाला,
तर गौरव बापट यांच्या नावाचाही विचार होऊ शकेल. मोहोळ, मुळीक आणि देवधर यांच्याकडून जनसंपर्क वाढविण्यात आला आहे.
मोहोळ आणि मुळीक यांच्याकडून विविध सार्वजनिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. तर, देवधर हे जनसंपर्क वाढवत आहेत.