हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात बैठकीतच एकमेकांना शिवीगाळ
Hingoli Guardian Minister Abdul Sattar Sattar and MP Hemant Patil abused each other in the meeting

हिंगोली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. या बैठकीमध्ये खासदार हेमंत पाटील आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली.
खासदार हेमंत पाटील यांनी निधीवाटप करताना टक्केवारीचं शेण खाल्लं, असा आरोप पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. त्यावर सत्तार यांचा पारा चढला.
दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. दोघेही नमतेपणा घेत नव्हते. प्रकरण थेट शिवीगाळ करण्यापर्यंत गेलं. अखेर खासदार पाटील यांचा माईक म्यूट करून बैठक सुरू ठेवण्याची वेळ आली.
हिंगोली जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकीला खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे,
आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे यांचीही उपस्थिती होती. तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव हे अधिकारीही उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीची बैठक प्रत्यक्ष स्वरूपात घेण्याचे ठरलेले असताना पालकमंत्री सत्तार यांनी अचानकपणे आपला प्रवास दौरा रद्द करत ही बैठक ऑनलाईन घेण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.
बैठकीच्या सुरूवातीलाच निधी वाटपातील भेदभावावरून खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक रूप धारण करून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधातील आपला इरादा स्पष्ट केला.
राज्यात इतके जिल्हे असताना हिंगोलीसारख्या मागास जिल्ह्यात येवून निधीवाटपात शेण खाणं योग्य नाही, असं खासदार हेमंत पाटील म्हणाले. यावरून पालकमंत्री सत्तारही संतापले.
दरम्यान, मंत्रीमहोदय आणि खासदारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. निधीवाटप जर असंच सुरू राहिलं तर शिवसैनिक तुम्हाला पायाखाली घेतील, असा इशाराच पाटील यांनी दिला. त्यावर सत्तारही तावातावाने बोलू लागले.
पालकमंत्री सत्तार आणि खासदार पाटील दोघांनीही असंवैधानिक शब्दाचा वापर केला असल्याचे या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.
दोघांमधील वाद बघून या बैठकीतील अधिकारी आणि सदस्यांची भंबेरी उडाली. पालकमंत्र्यांनी आमदारांना बोलण्यासाठी विचारले असताना उपस्थित आमदारांनी ऑनलाईन मीटिंगमध्ये काहीच ऐकू येत नसल्याचे सांगितले.
या घडलेल्या प्रकाराची प्रशासकीय व राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे.