भाजपाच्या “या” फार्म्युल्याने महाराष्ट्रातील ‘या’ खासदारांची उमेदवारी धोक्यात?
With this formula of BJP, the candidature of 'these' MPs in Maharashtra is in danger?
आगामी लोकसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी भाजप नवा फॉर्म्युला राबवणाराय. त्यानुसार 70 पेक्षा अधिक वय असलेल्या आणि तीन टर्म खासदार असलेल्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देऊ नये,
असा फॉर्म्युला कर्नाटक भाजपनं सुचवलाय. कर्नाटकमध्ये सध्या भाजपचे 25 खासदार आहेत. हा फॉर्म्युला लागू केल्यास 25 पैकी 11 विद्यमान खासदारांची तिकिटं कापली जाण्याची शक्यता आहे..
त्यामध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्यासह जी. एम. सिद्धेश्वर, रमेश जिंगजिंगानी, बी. एन. बच्चे गौडा, मंगला अंगाडी, जी. एस. बसवराज,
व्ही. श्रीनिवास प्रसाद, वाय. देवेंद्रप्पा आदींचा समावेश असल्याचं समजतंय.पण , हा फॉर्म्युला केवळ कर्नाटकपुरता मर्यादित नसेल. तर महाराष्ट्रासह देशभरात लागू करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. तसं झाल्यास
महाराष्ट्रातून दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची भीती आहे. माजी मंत्री सुभाष भामरे आणि रामदास तडस यांचं वय 70 आहे. त्यामुळं हा फॉर्म्युला राबवल्यास भामरे आणि तडस यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वतःहून निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती.
70 पेक्षा जास्त वय असलेल्यांना तिकीट नाकारण्याची चर्चा त्यावेळीही भाजपात होती. आता पुन्हा एकदा तशीच शक्यता आहे.
सत्तेची हॅट्रीक करण्यासाठी जास्त खासदार निवडून आणण्याच भाजपाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्याचा भाजपाचा प्लॅन आहे.
या प्लान नुसार लोकसभेत मोदींसोबत तरुण खासदारांची फळी असणार आहे. देशात तरुणांची संख्या 63 टक्के असल्याचा रिपोर्ट आहे.
त्यामुळे भाजपाचा या तरुण मतांवर डोळा आहे. एकाच खासदाराला तीनहून अधिकवेळा तिकिट दिल्यास तरुण कार्यकर्ता दूर जाण्याची भीती आहे. त्यामुळे 40 ते 55 वयोगटातील चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असले.
त्यातच महाराष्ट्र दौऱ्यात पीएम मोदींनी तरुणांना राजकारणात येण्याची साद घातली. लोकशाहीत तरूणांचा सहभाग जेवढा जास्त असेल, तेवढंच देशाचं भविष्य चांगलं असेल.
तरूण सक्रिय राजकारणात आले, तर घराणेशाहीच्या राजकारण कमी होत जाईल. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे, असंही पीएम मोदींनी म्हटलं आहे.
याआधी वयाची सत्तरी पार केलेल्या बड्या नेत्यांची रवानगी भाजपनं मार्गदर्शक मंडळात केलीय. आता खासदारकीसाठीही हाच निकष लावला जाणार असल्याची चर्चा आहे. हा फॉर्म्युला फायनल झाल्यास राजकारणातून बडे नेते कायमचे रिटायर होतील.