काँग्रेस पक्षाकडून बारा उमेदवारांच्या नांवावर शिक्कामोर्तब ?
Sealed on the names of twelve candidates from the Congress party?

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १२ जागांसाठी उमेदवार निश्चित केल्याची माहिती आहे. नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला.
महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली असून त्यानंतरच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार असल्याचे समजते.
परंतु धुळे, रामटेक, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई आणि उत्तर मुंबई मतदारसंघांबाबत काँग्रेसने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
मुंबईतील तीनपैकी दोन जागा जिंकण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. अभिनेते राज बब्बर, माजी मंत्री नसीम खान, सामाजिक कार्यकर्त्या स्वरा भास्कर आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची नावं मुंबईतून आघाडीवर आहेत.
वर्षा गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबईवर दावा केला आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी केले होते.
धुळ्याचे आमदार कुणाल पाटील यांना पुन्हा निवड होण्याची आशा आहे, तर माजी मंत्री नितीन राऊत आणि पुत्र कुणाल राऊत हे रामटेकसाठी आघाडीवर आहेत.
दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेदेखील दक्षिण मध्य मुंबईवर दावा केला आहे. राज्यसभा खासदार अनिल देसाई हे त्यांचे संभाव्य उमेदवार आहेत.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यात देशभरातील लोकसभेच्या जागांवरील
इच्छुक उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली. यात महाराष्ट्रातील एकूण १६ जागांसाठी चर्चा होऊन १२ नावे फायनल करण्यात आल्याचे कळते.
या १२ जागांमध्ये कोल्हापूर येथून छत्रपती शाहू महाराज, सोलापूर येथून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर, अमरावती येथून बळवंत वानखेडे, गडचिरोली येथून
नामदेव किरसान, नागपूर येथून विकास ठाकरे, नांदेडहून वसंत चव्हाण, लातूरहून शिवाजी काळगे, नंदुरबार येथून गोवाल पाडवी आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे कळते..