महाराष्ट्रात येणार थंडीची लाट,पारा घसरणार, हवामान विभागाचा अंदाज
Cold wave will come in Maharashtra, mercury will fall, Meteorological department predicts
भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागीय केंद्राद्वारे १९ जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
थंडीची लाट राज्यातील विविध भागात जाणवेल आणि तापमान कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागीय केंद्राचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
जानेवारीत राज्यातील कमाल तापमान राज्यभरात सामान्य तापमानापेक्षा कमी असेल. १९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान या कालावधीत राज्यभरातील तापमान किमान तापमानापेक्षा कमी असेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
अनुपम कश्यपी यांनी राज्यात मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमान थोडंसं वाढलेलं १९ जानेवारीपर्यंत जाणवेल, असं म्हटलं.
पुण्यातील किमान तापमान हे सामान्य तापमानापेक्षा थोडंसं अधिक आहे. शिवाजीनगर भागात १५ ते १७.३ सेल्सिअसची नोंद झालेली आहे.
हे सामान्य तापमानापेक्षा ४ ते ६ अंशानी अधिक असल्याचं कश्यपी यांनी सांगितलं. पुण्यात येत्या काही दिवसात तापमान घटताना दिसून येईल.
१९ ते २५ जानेवारीदरम्यान किमान तापमान हे सामान्य तापमानापेक्षा कमी झालेलं असेल. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये ही स्थिती असेल, असं ते म्हणाले. थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात जाणवेल, असंही ते म्हणाले.
तापमान कमी झाल्यानं आकाश निरभ्र असेल. १२ ते २५ जानेवारी दरम्यानच्या उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम जाणवून त्यामुळं किमान तापमान घसरेल, असं कश्यपी यांनी म्हटलं.
उत्तर भारतातील थंड ठिकाणांहून सुटणाऱ्या उत्तरकेडील वाऱ्यांमुळं महाराष्ट्रातील हवा थंड असेल. त्यामुळं वातावरणात गारठा जाणवेल.
दरम्यान, राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याचं चित्र आहे. हिवाळ्यातही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
नागपूर, बुलढाणा, जालना, सातारा, सांगली जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. यामुळं काही ठिकाणी खरिपातील पिकांना फायदा होऊ शकतो. राज्यात मान्सूनचा पाऊस मात्र यंदा कमी प्रमाणात झाला होता.