खासगी विद्यापीठांमुळे गरिबांच्या शिक्षणाची दारे बंद
Due to private universities, the doors of education of the poor are closed

पुणे;राज्यातील खासगी विद्यापीठांसंदर्भातील नव्या विधेयकामुळे संबंधित विद्यापीठात शिकणारा गरजू विद्यार्थी शिष्यवृत्तींसारख्या सवलतींपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे गरजुंच्या शिक्षणाची दारे बंद होणार आहेत.
खासगी विद्यापीठांच्या विधेयकामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संक्रांत आली आहे,’’ अशी टीका जनता दलाचे (युनायटेड) राष्ट्रीय महासचिव आणि आमदार कपिल पाटील यांनी पुण्यात केली.
खासगी विद्यापीठांच्या विधेयकांसंदर्भात पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘कोल्हापुरात चप्पल बनवणाऱ्या कारागिरांची मुले असो,
वा अगदी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मुले असोत, हे सगळे विद्यार्थी खासगी विद्यापीठांसंदर्भातील नव्या विधेयकामुळे शिक्षण व्यवस्थेतून बाहेर फेकले जाणार आहेत.
त्यांच्या शिक्षण हक्कावर गदा येणार आहे. यंदा महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सारथी, महाज्योती, बार्टी आणि टार्टी संबंधित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकल्यामुळे त्यांचे शिक्षण थांबण्याची भीती निर्माण झाली आहे.’’
खासगी विद्यापीठांचे नवे विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी लवकरच राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. ‘हे विधेयक मागे घेऊन त्यात सुधारणा करण्यात यावी,’ अशी मागणी पाटील हे करणार आहेत.
ते म्हणाले,‘‘विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या विधेयकाविरोधात आवाज उठवायला हवा. शक्य तिथे विधेयकाची होळी करत निषेध केला पाहिजे’’