राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे पाठोपाठ आता शिंदे गट ही सुप्रीमकोर्टात
Tras la oposición de Thackeray a la decisión de Rahul Narvekar, ahora el grupo Shinde está en el Tribunal Supremo

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी निकाल दिला. या निकालानुसार शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले आहेत.
नार्वेकरांनी कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र ठरवलेलं नाही. तसेच खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली आहे. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाने नार्वेकरांच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटानेही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
तर, ठाकरे गटातील आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात शिदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राहुल नार्वेकर यांच्या निकालावर शिवसेनेचे दोन्ही गट असंतुष्ट असून दोन्ही गटांनी न्यायालयात धाव घेतली आहेच. यावर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नार्वेकर यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी नार्वेकर म्हणाले, मी कोणालाही संतुष्ट करण्यासाठी हा निकाल दिलेला नाही.
मी कायद्याला धरूनच हा निकाल दिला. कायद्याच्या अनुषंगाने आणि संविधानातील तरतुदींचं पालन करून, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायलयाच्या तत्वांच्या आधारावर हा निकाल दिला आहे.
दरम्यान, दोन्ही गटाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर राहुल नार्वेकर म्हणाले, आपल्या देशात कोणताही नागरिक संविधानाच्या कलम २२६ आणि कलम ३२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात
किंवा उच्च न्यायालयात निश्चितपणे दाद मागू शकतो. त्यांनी याचिका दाखल केली म्हणजे मी दिलेला निर्णय अयोग्य ठरला असं होत नाही. माझा निर्णय अयोग्य ठरवण्यासाठी त्यात काही नियमबाह्य आहे का?
त्यात काही घटनाबाह्य आहे का? अथवा काही बेकायदेशीर घडलंय का? ते न्यायालयाला दाखवावं लागेल. तसं सिद्ध केलं तरच तो निर्णय रिव्हर्स होऊ शकेल
शवसेनेचे दोन गट झाल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली होती. त्यामुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि शिंदे गटातील आमदारांना अपत्र ठरवावं, अशी मागणी केली होती.
परंतु, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घटनेतील नियमानुसार विधानसभा अध्यक्षांवर सोपवला होता. त्यानंतर तब्बल सात महिन्यांनी विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणी निकाल दिला.
नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी मुंबईतील विधान भवनात या निकालाचं वाचन केलं. राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निर्वाळा दिला.
तसेच शिंदे गटातील आमदारांना पात्र ठरवलं. त्याचबरोबर नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांनाही पात्र ठरवलं आहे.