झटपट पैसे कमावण्याचे आमिष देत कोट्यवधींना लुटले
Crores were robbed by giving the lure of making quick money

झटपट पैसे कमावण्याच्या नादात बनावट कंपनीत पैसे गुंतवणे तीन कोळसा व्यापाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. एका वर्षांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून
नागपुरातील तीन कोळसा व्यापाऱ्यांची चक्क दोन कोटींची फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
कोल ट्रेडिंग आणि मायनिंगचा व्यवसाय करत असलेले नागपुरातील फ्रेंड्स कॉलनीतील 38 वर्षीय व्यापारी राजेशकुमार सिंग यांनी बी. एस. ईस्पात लिमीटेड या कंपनीशी त्यांनी मिल माईन्ससंदर्भात व्यवहार केला होता.
तेव्हा त्यांची ओळख तेथील व्यवस्थापकीय संचालक भवानीप्रसाद मिश्रा याच्याशी झाली. दरम्यान, मिश्रा यांनी आपल्या बी. एस. ईस्पात लिमीटेड कंपनी मध्ये गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट मिळेल,
असा बनाव रचत राजेशकुमार सिंग यांना आमिष दाखवले. त्यानुसार दुप्पट परतावा मिळेल या आशेने राजेशकुमार सिंग यांनी काही रक्कम त्यांच्या कंपनीत गुंतवली.
त्यांतर 2022 मध्ये मिश्रा आणि त्या कंपनीतील अकाऊन्टंट सागर कासनगोट्टुवार यांनी सिंग यांना धंतोलीतील चिंतामणी अपार्टमेंट् मधील कार्यालयात भेटायला बोलविले.
या भेटी दरम्यान तुम्ही आणि तुमच्या इतर परिचयातील लोकांनी जर आमच्या कंपनीत पैसे गुंतविले तर वर्षभरात त्यांना देखील दुप्पट पैसे मिळतील’ अशी बतावणी केली.
त्यासाठी अनेक आश्वासन देखील देण्यात आले. या दोघांवर विश्वास ठेवून सिंग हे त्यांचे परिचित ब्रिजेश अग्रवाल आणि मेधा किशोर अग्रवाल यांना घेऊन दोघांना भेटले.
या भेटीतनंतर 8 एप्रिल 2022 ते 29 मार्च 2023 या कालावधीत सिंग यांनी स्वत: 1.34 कोटी रुपये मिश्राच्या खात्यात वळते केले. मिश्राने नफ्याच्या नावाखाली त्यातील 47 लाख परत केले.
मात्र उर्वरित 87.35 लाख दिलेच नाही. नंतर ही रक्कम परस्पर हडप करून फसवणूक केली. मेधा अग्रवाल यांनी देखीळ 58 लाख तर ब्रिजेश अग्रवाल यांनी 50 लाख गुंतविले होते.
मात्र आरोपींनी त्यातील एकही पैसा परत केला नाही. सिंग आणि इतर दोघांचे मिळून आरोपींनी 1.93 कोटी रुपये गंडविले. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी वारंवार त्यांना पैसे परत देण्याबाबत विचारणा केली.
मात्र मिश्रा याने अनेक कारणे देत पैसे देण्याबाबत टाळाटाळ करत राहीला. अखेर सिंग यांनी त्याला गाठून त्यांच्याकडे रक्कम मागितली.
मात्र काही केल्या तो पैसे देण्यास तयार नव्हता. अखेर राजेशकुमार सिंग यांनी धंतोली पोलीस ठाणे गाठून पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या फसवणूक प्रकरणात एका मोठ्या राजकीय नेत्याचा संबंध असल्याची चर्चा आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.