खासदार पूनम महाजन यांची उमेदवारी धोक्यात ?
MP Poonam Mahajan's candidacy in danger?

केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पियूष गोयल मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी कोणता मतदारसंघ योग्य आणि सुरक्षित ठरेल याची चाचपणी सुरू आहे.
पियूष गोयल २०१० पासून राज्यसभेचे खासदार आहेत. सलग तीन वेळा ते महाराष्ट्रातून निवडून गेले आहेत. आता भाजपनं त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.
राज्यसभेतील नेत्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगून राज्यसभेत नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची अशी भाजपची योजना आहे. त्याच योजनेचा भाग म्हणून गोयल यांना मुंबईतून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते.
मध्य उत्तर मुंबई किंवा उत्तर मुंबई या मतदारसंघातून त्यांना तिकिट दिलं जाण्याची शक्यता आहे. पूनम महाजन या मध्ये उत्तर मुंबईच्या खासदार आहेत.
तर गोपाळ शेट्टी उत्तर मुंबई मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. या दोघांपैकी एकाचं तिकिट कापलं जाण्याची शक्यता आहे.
गोपाळ शेट्टींनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा ४ लाख ६५ हजार मतांनी पराभव केला होता. महाराष्ट्रात इतक्या मोठ्या मताधिक्क्यानं अन्य कोणत्याही उमेदवाराला विजय मिळालेला नव्हता.
त्यामुळे शेट्टींची जागा भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन १ लाख ३० हजार मतांनी विजयी झाल्या होत्या.
विशेष म्हणजे शेट्टी आणि महाजन २०१४ पासून खासदार आहेत. दोन्ही नेत्यांची खासदारकीची दुसरी टर्म सुरू आहे. २०१४ आधी या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचे खासदार होते.
राज्यसभेतील नेत्यांना, मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची रणनीती भाजपनं आखली आहे. गोयल केंद्रातील महत्त्वाचे मंत्री आहेत. वाणिज्य, वस्त्रोद्योग, ग्राहक संरक्षण,
अन्न आणि नागरी पुरवठा अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. गोयल यांना उत्तर मध्य मुंबईतून संधी द्यायची की सर्वात सुरक्षित असलेल्या उत्तर मुंबईतून तिकिट द्यायचा याबद्दल विचार सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असावेत यासाठी भाजपनं सर्वेक्षण सुरू केलं आहे. त्यासाठी चार कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी कोणते मतदारसंघ सुरक्षित असतील याचंही सर्वेक्षण सुरू आहे. पक्षाच्या विद्यमान खासदारांच्या कामगिरीचं मूल्यांकनदेखील सुरू आहे.