अशोक चव्हाणांना भाजकडून राज्यसभेची उमेदवारी ?
Rajya Sabha nomination for Ashok Chavan from BJP?

अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं ते आता भाजप प्रवेश करतील
आणि त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात येईल, असंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सूचक विधान केलं आहे.
माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी बावनकुळेंना प्रश्न विचारला की? अशोक चव्हाण भाजपत दाखल झाल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार का?
यावर बानवकुळे म्हणाले, आत्तापर्यंत या सेकंदाला माझ्याकडं असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. अध्यक्ष म्हणून माझ्याकडं अशी कुठलीही चर्च झालेली नाही.
मोदींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे. त्यांच्या या संकल्पाला साथ देण्यासाठी आमची विचारधारा कोणी स्विकारत असेल तर त्यांचं स्वागत आहे.
राज्यसभेची निवडणूक काही फार संघर्षाची होणार नाही. कारण सर्वांची क्षमता सर्वांकडं आहे. या राज्यसभा निवडणुकीत फार मोठ्या घडामोडी होतील असं वाटत नाही.
कुठल्याही पक्ष प्रवेशाचा पक्षाला फायदा होत असतो. कारण प्रत्येकाकडं क्षमता आहे वलय आहे. त्याचा त्याला फायदा होत असतो.
अशोक चव्हाणांसोबत मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी यांनाही राज्यसभेवर पाठवणार असल्याचं बोललं जात आहे, या प्रश्नावर मला याबाबत काहीही माहिती नाही असंही बानवकुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा आणि विधीमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून ते भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे.
अशोक चव्हाण यांनी स्वतःही याबाबत माहिती दिली. पुढचा निर्णय दोन दिवसांमध्ये जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांच्या भूमिकेनंतर काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे आम्हाला दुःख झालं आहे. पक्षाने त्यांना मोठमोठ्या पदावर संधी दिली होती. परंतु सध्या भाजपकडून ज्या पद्धतीचं राजकारण सुरु आहे, त्यावरुन त्यांच्यावर कोणता दबाव होता का, हे स्पष्ट होईल.
चव्हाण पुढे म्हणाले, अशोक चव्हाण पक्ष सोडून गेलेले असले तरी त्यांच्यासोबत इतर आमदार, पदाधिकारी जाणार नाहीत. भाजपकडून केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे उद्या आम्ही आमदारांची बैठक बोलावली असून सगळे मुंबईत येत आहेत. कुणी कुठेही गेलेलं नाही.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. त्यांना कोणत्या कारणामुळे बाध्य केलं गेलं, हे समजत नाहीये. असं असलं तरी काँग्रेस मजबुतीने भाजपचा सामना करणार आहे.
‘काँग्रेसमधून राजीनामा देण्याचं नेमकं कारण काय?’ या प्रश्नाला अशोक चव्हाणांनी उत्तर दिलं की, प्रत्येक गोष्टीला कारण असलच पाहिजे, असं काही नाही. माझ्या जन्मापासून मी काँग्रेसचं काम केलं आहे. आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, असं वाटलं म्हणून राजीनामा दिला.
कुठल्याही पक्षांतर्गत गोष्टीची मी वाच्यता करणार नाही. मला उणी-दुणी काढायची नाहीत. आपण आता वेगळा विचार केला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. या निर्णयात माझी कोणतीही मजबुरी नाही… असं अशोक चव्हाणांनी राजीनाम्यानंतर स्पष्ट केलं.