मनोज जरांगेंवर केंद्रीय मंत्री संतापले;पाहा काय आहे प्रकरण
Union Minister angry with Manoj Jarang; see what is the case

राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करावा, तसेच तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे.
सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर भाजप नेते नारायण राणे चांगलेच संतापले आहेत.
मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय…
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 14, 2024
राणे यांनी ट्वीटरवर पोस्ट करत मनोज जरांगे पाटील यांना थेट इशाराच दिला आहे. “मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही”, असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं आहे.
“देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव !
तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत”, असा इशाराही राणे यांनी जरांगेंना दिला आहे.
दरम्यान, नारायण राणे यांच्या या इशाऱ्यानंतर मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी आपलं उपोषण सुरूच ठेवलं असून त्यांची प्रकृती खालावली आहे.
जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती मराठा बांधव करीत आहेत.
मात्र, जरांगे उपोषणावर ठाम असून उपचारासाठी नकार देत आहेत. राज्य सरकार जोपर्यंत सगेसोयरे अध्यादेशाबाबत काय करत नाहीत, तोपर्यंत मी उपोषण सुरूच ठेवणार,
अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. सरकारने तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली आहे.