अबू आझमी म्हणाले मुस्लिमांनी असे आंदोलन केले असते तर गोळ्या घातल्या असत्या
Abu Azmi said Muslims would have been shot if they had protested

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज महाराष्ट्र विधिमंडळाचं एक दिवसीय अधिवेशन पार पडतंय, याचा आम्हाला आनंद आहे. परंतु गोरगरीब मुस्लिम समाजाचा कोणताही पक्ष विचार करत नाही.
कोणतंच सरकार आम्हाला आरक्षण देत नाहीये. मराठा समाजाला न्याय देण्याची राज्य शासनाची भूमिका असताना मुस्लिम समाजावर अन्याय कशासाठी?
असा सवाल विचारून मराठ्यांसोबत आम्हालाही आरक्षण हवं, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन पार पडतंय. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाजाला शिक्षण
आणि सरकारी नोकरीत १० टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले जाणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरूवात झाली आहे.
तत्पूर्वी विधिमंडळ आवारात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलन केलं. मुस्लिमांवरील अन्याय थांबवा,
मराठा समाजासोबत मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत ५ टक्के आरक्षण लागू करा, असा फ्लेक्स घेऊन दोघा आमदारांनी घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरक्षणप्रश्नी आपली भूमिका मांडली.
मराठा आरक्षणासाठी आज एक दिवसाचं अधिवेशन आहे. आम्हाला आनंद आहे की मराठा आरक्षणासंदर्भात विधेयक सादर होत आहे.
पण मराठा आरक्षणाविषयी कायदा होत असताना इतर समाजावर अन्याय होऊ नये. सच्चर कमिटीने मुस्लिम आरक्षणासंदर्भात अहवाल दिला आहे.
विलासराव देमुख यांच्या कार्यकाळात देखील मुस्लिम आरक्षणासंदर्भात अहवाल देण्यात आला. परंतु कोणतेच सरकार मुस्लिमांना आरक्षण देत नाहीये.
सतत मुस्लिमांवर अन्याय होत आलाय. विविध राजकीय पक्षांना फक्त मुस्लिम मते हवी आहेत, अशी टीका त्यांनी केली.
मराठा समाजाने आंदोलन केले, सरकारच्या नाकात दम आणला तेव्हा आंदोलनाची दखल घेऊन आरक्षणासंबंधी कायदा केला जात आहे. पण मुस्लिम समाजाने जर असं आंदोलन केले असतं तर
सरकारने आंदोलकांना गोळ्या घातल्या असत्या. हजारो मुस्लिम मृत्युमुखी पडले असते, असे विधान अबू आझमी यांनी केले.