मराठवाड्यात मार्च महिन्यात धावणार विजेवर रेल्वे ;”हे” होणार फायदे
Electric railway will run in Marathwada in March; "This" will be beneficial

नांदेड विभागात डिझेल इंजिनीवरील प्रवासी वाहतुकीचा काळ आगामी नवीन आर्थिक अर्थसंकल्पात संपणार आहे. नांदेड विभागातील विविध रेल्वे मार्गांवर विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू आहे.
या अंतर्गत मानवत रोड ते परभणी या दरम्यान रेल्वे विद्युतीकरणाचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. याशिवाय मार्च अखेरपर्यंत
मिरखेल ते मालटेकडीपर्यंतचे विद्युतीकरण पूर्ण करून नांदेड विभागातील रेल्वे मार्गाचे १०० टक्के विद्युतीकरण केले जाणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वे विभागात असलेल्या नांदेड विभागात मनमाड-मुदखेड-ढोण या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम वर्ष २०१५- २०१६ मध्ये मंजूर करण्यात आले होते.
या कामासाठी अंदाजे ८६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ४२० किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्याचे नियोजित करण्यात आले होते.
त्यानुसार रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या अंतर्गत अंकाई ते जालना उस्मानपूरपर्यंत रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. उस्मानपूर ते मानवत रोड हे कामही झाले आहे.
सध्या मानवत रोड ते परभणी दरम्यान विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू आहे. सदर कामासाठी पोलच्या उभारणीसह अन्य कामे करण्यात आली आहेत.
सदर काम फेब्रुवारी २०२४ मध्ये पूर्ण केले जाणार आहे. परभणी ते मिरखेल या दरम्यान पूर्वी दुहेरी रेल्वे मार्गाच्या कामाच्या वेळी विद्युतीकरण करण्यात आले आहे.
आता मिरखेल ते मालटेकडी या मार्गावरील विद्युतीकरणाचे कामही सुरू केले जाणार आहे. मिरखेल ते मालटेकडी दरम्यान सर्वेक्षण करण्यात आलेले असून,
मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर नांदेड विभागातील सर्व रेल्वे मार्ग हे शंभर टक्के विद्युतीकरण होणार आहेत. यामुळे नवीन आर्थिक वर्षात नांदेड विभागातील सर्व रेल्वे विजेवर धावतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पूर्ण झालेली कामे
मार्ग किमी
अंकाई ते रोटेगाव ३७
रोटेगाव ते छत्रपती संभाजीनगर ७४
छत्रपती संभाजीनगर ते जालना ५६
जालना ते उस्मानपूर ५३
उस्मानपुर ते मानवत रोड ४२
विद्युतीकरणाचे फायदे
– प्रवासी रेल्वे तसेच मालवाहू रेल्वेची गती वाढणार
– डिझेल इंजिन फेल होऊन होणारी अडचणी दुर होणार
– विद्युतीकरणामुळे लांबपल्लयाच्या गाड्या जालना मनमाड मार्गे सुरू होणार.
– पर्यावरणासाठी घातक असलेले कार्बनाचे उत्सर्जन थांबून पर्यावरण अधिक शुद्ध राहणार
डिझेल वरील खर्च होणार कमी
नांदेड विभागातील महत्वाचे काही मार्ग हे विद्युतीकरण झालेले नाही. यामुळे या मार्गावर डिझेल इंजिनचा वापर करावा लागत आहे.
या डिझेल इंजिनचा वापर प्रवासी वाहतूकीसाठी होत असल्याने, रेल्वेला डिझेल खरेदीसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. विद्युतीकरणामुळे डिझेलवरील खर्च कमी होणार आहे.