एसटी तर्फे आता मोफत प्रवास योजना , कोण ठरणार पात्र ?
Free travel plan now by ST, who will be eligible
राज्यात ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात सर्वात विश्वासार्ह वाहतूक म्हणून एसटीची ओळख आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात.
एसटीने विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांसाठी सवलत योजनाही आणल्या आहेत. नुकतेच सर्व गटातील महिलांसाठी बस तिकिटांवर 50 टक्के सवलत योजना सुरू केली.
या योजनेला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
आता परिवहन महामंडळाने सहा महिने मोफत प्रवासाची योजना आणली आहे. ही योजना एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाच्या ७५ वर्षांपर्यंत,
तर मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नीला ६५ वर्षांपर्यंत सहा महिने घेता येणार आहे. म्हणजेच त्यांना सहा महिने मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. महामंडळाचे महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांनी यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.
एसटीतर्फे कर्मचाऱ्यांना सप्टेंबर ते फेब्रुवारी या काळात सहा महिन्यांचा पास मिळणार आहे. हा कालावधी एसटीचा ऑफ सिझन कालावधी असतो.
त्यामुळे या काळातच ही सवलत घेता येणार आहे. मार्चनंतर लग्नसराई आणि सुट्यांमुळे प्रवाशांची गर्दी असते. त्या काळात ही सवलत मिळणार नाही.
म्हणजे मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांमध्ये ही सवलत घेता येणार नाही. महामंडळाच्या या नवीन सुविधेचा लाभ राज्यातील १० हजारांपेक्षा जास्त सेवानिवृत्त/ मयत कर्मचाऱ्यांच्या विधवा, विधूर यांना होणार आहे.
महामंडळाच्या योजनेते सेवानिवृत्त झालेले, ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या कर्मचारी पात्र ठरणार आहे. तसेच सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला,
सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा, विधूर
यांना मोफत प्रवास पास दिली जाणार आहे. यापूर्वी मयत कर्मचाऱ्यांच्या विधवा व विधूर यांना वर्षातून केवळ एक महिन्याचा मोफत पास मिळत होता.