शिंदे गटाच्या १३ खासदारांपैकी काहींना घरी बसावे लागणार?
Some of the 13 MPs of the Shinde group will have to sit at home?
महायुतीत पक्षांची गर्दी वाढल्यानंतर जागावाटपाचा गोंधळही वाढला आहे. आधी केवळ शिवसेना-भाजप असताना युतीच्या फॉर्म्युलानुसार तिकीटवाटप सहज शक्य होते.
परंतु दरम्यानच्या काळात मोदींची ४०० पारची महत्त्वाकांक्षा वाढली, तशी महायुतीत पक्षांची संख्याही वधारली. आता अजित पवार
यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीशी धोरणात्मक युती झाल्याने त्यांच्या खासदारांना सामावून घेणेही केंद्रीय नेतृत्वाला अपरिहार्य झाले आहे.
अशातच शिवसेनेवर दबाव वाढत चालल्याची चर्चा आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या सर्व १३ विद्यमान खासदारांना तिकीट मिळावे, यावर ठाम आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४८ पैकी २५ जागा लढवल्या होत्या, तर शिवसेनेने २३ जागांवर समाधान मानले होते. भाजपने त्यापैकी २३ जागा जिंकल्या,
तर शिवसेनेने १८. यापैकी १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. यंदा भाजपची बार्गेनिंग पॉवरही वाढली आहे. त्यामुळे भाजप ३० जागांवर
लढण्यावर ठाम असल्याचे बोलले जाते. शिवसेना यंदाही २२ जागांसाठी अडून बसली होती, परंतु भाजपकडून दबाव वाढत असल्याचं बोललं जातं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी मुंबईत दाखल झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसाप सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काही काळ सोबत होते, मात्र ते नंतर निघून गेले. त्यानंतर अमित शहा यांची एकनाथ शिंदे यांच्याशी वन-टू-वन बैठक झाली.
एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षातील सर्व १३ विद्यमान खासदारांना तिकीट मिळावेत यासाठी आग्रही होते. परंतु शहा यांनी त्यांना प्रत्येक मतदारसंघाची ग्राऊण्ड रिअॅलिटी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे १३ पैकी काही विद्यमान खासदारांची तिकिटं कापली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान जागावाटपाची चर्चा आजही सुरु राहण्याची शक्यता असल्याचे
सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जागावाटपाच्या अंतिम सूत्राकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. राज्यातील ४८ पैकी ३२ जागा भाजप लढवू शकतो. शिंदेंच्या शिवसेनेला १० आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ ते ३ जागा सोडल्या जाऊ शकतात.
अजित पवार गटाला बारामती, रायगढ, शिरुर, मावळ यातील २ ते ३ जागा दिल्या जाण्याची दाट शक्यता आहे. यानंतर उरणाऱ्या ४ जागांवर शिवसेना, राष्ट्रवादीचे उमेदवार दिले जाऊ शकतात. पण त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितलं जाईल.
गृहमंत्री अमित शहांनी सह्याद्री अतिथी गृहावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. त्यात जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे.
सर्वात आधी अमित शहांनी फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा केली. ही बैठक अर्धा तास चालली. त्यानंतर दोन्ही नेते अतिथी गृहावरुन निघाले.
फडणवीस आणि अजित पवार निघून गेल्यानंतर अमित शहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्याशी ४५ मिनिटं चर्चा केली.
सुत्रांच्या माहितीनुसार, या दोन बैठकांमध्ये बहुतांश जागांचा प्रश्न सुटला आहे. शिंदे आणि अजित पवार गट ज्या जागा जिंकू शकतात, त्याच त्यांना देण्यात येतील.
काही जागांची अदलाबदल होईल. गरज पडल्यास शिंदे, अजित पवारांच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवाव्या लागतील, अशी चर्चा बैठकांमध्ये झाली.
अमित शहांनी बैठक संपवल्यानंतर शिंदे तिथून बाहेर पडले. पण त्यानंतर शिंदे आणि अजित पवार पुन्हा एकदा सह्याद्रीवर पोहोचले. त्यांनी पुन्हा शहांची भेट घेतली.
रात्री उशिरा झालेल्या बैठकीत अमित शहांनी शिंदे आणि अजित पवारांना स्पष्ट शब्दांत काही गोष्टी सांगितल्या. जागा मागताना आक्रमक होऊ नका. तर्कसंगत मुद्दे मांडा, अशा सूचना शहांनी केल्या ८ तासांमध्ये शिंदे, पवार दोनदा शहांना भेटले.
अजित पवारांना २ ते ३ जागा सोडण्याची तयारी भाजपनं दर्शवली आहे. त्यांच्याकडे सध्या लोकसभेचा केवळ एक खासदार आहे. त्यामुळे जागावाटपात त्यांना काहीच नुकसान नाही.
दुसरीकडे एकनाथ शिंदेंना १० जागा देण्याची भाजपची तयारी आहे. शिंदेंसोबत १३ खासदार आहेत. त्यामुळे भाजपचा प्रस्ताव शिंदेंची कोंडी करणारा आहे.
यातून त्यांचं नुकसान होईल. तिसरीकडे भाजपनं ३२ जागांवर दावा केला आहे. भाजपनं गेल्या निवडणुकीत २५ जागा लढवल्या आहेत.
आता ते ३२ जागा लढवण्याच्या तयारीत आहेत. शिवाय मित्रपक्षांच्या उमेदवारांना कमळावर लढण्यास सांगून ते स्वत:च्या खासदारांचा आकडा वाढवू शकतात.