गुट्टे यांची आमदारकी रद्द करा;जिल्हाधिकार्यांकडे निवेदन
Cancel Gutte's MLA; representation to District Magistrate

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लि.कंपनी गैरमार्गाने दिवाळखोर घोषित केल्याप्रकरणी
घटनेतील कलम 191 अन्वये विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.
याच मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी (दि.21) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, आ.गुट्टे यांनी गंगाखेड शुगर्सद्वारा जाहीर केलेली दिवाळखोरी हे गंभीर प्रकरण आहे. यातून हजारो शेतकरी, ऊसतोडणी वाहतूकदार,
साखर कामगार यांच्यासह अन्य व्यावसयिक देखील उध्वस्त झाले आहे. त्यांच्या विरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये दि.5 जुलै 2017 रोजी शेतकर्यांच्या नावावर परस्पर कर्ज मंजूर करून घेवून बेकायदेशीरपणे रक्कम हडप केल्या प्रकरणी
भा.दं.वि. 406, 409, 417, 420, 467, 468, 471 व 120 ब कलमान्वये गुन्हा दाखल आहे. त्याच बरोबर दि 7 फेब्रुवारी 2023 रोजी दिल्ली येथे
या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ने युको बँक व्यवस्थापनाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आ.गुट्टे हे जामिनावर आहेत.
या प्रकरणात 409.26 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषारोप ठेवण्यात आले आहे. हे दोषारोप असताना राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणात दिवाळखोरी मंजूर करण्यासाठी गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लि.द्वारा अर्ज केला.
या दिवाळखोरीस युको बँक प्रशासनाने कोणताही विरोध केला नाही. यासाठी सत्ताधारी पक्षात असल्याचा दबाव वापरून गैरमार्गाने दिवाळखोरी मंजूर करून घेण्यात आलेली आहे, असा आरोप निवेदनात केला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी तातडीने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुट्टे यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी राष्ट्रपती, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल
आणि महाराष्ट्र विधान सभेचे सभापती यांच्याकडे महाराष्ट्र राज्य किसान सभेने केले आहे. याच प्रकरणी विविध मागण्यांचा समावेश असलेले निवेदन जिल्हाधिकारी कचेरीवर निदर्शने करून देण्यात आले.
आ.गुट्टे यांचे विधानसभा सदस्यत्व तत्काळ रद्द करा. ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी वाहतूकदार आणि कंत्राटदार, साखर कारखाना कामगार, विविध पुरवठादार यांची हजारो कोटी रुपयांची थकीत देणी तत्काळ अदा करा.
गंगाखेड शुगर्स कारखान्याने 4000 कोटी रुपयांच्या हडप केलेल्या कर्जामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांचा सातबारा तत्काळ कोरा करा.
सिबिल बोजा रद्दबातल करा व आर्थिक संकटातून मुक्त करा. गंगाखेड शुगर्स ला राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणातून युको बँक प्रशासनाने कोणताही विरोध न करता बहाल केलेल्या दिवाळखोरी प्रकरणी
सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने अपील दाखल करा. आंध्र बँक, बँक ऑफ इंडिया, खऊइख बँक, ओरिएन्तल बँक, सिंडीकेट बँक, युनियन बँक, रत्नाकर बँक विरुद्ध
आर्थिक घोटाळ्याचे आणि मनी लाँड्रींंगचे गुन्हे दाखल करा आदी मागण्या केल्या आहेत. निवेदनावर कॉ.क्षीरसागर यांच्यासह कॉम्रेड ओमकार पवार, कॉम्रेड चंद्रकांत जाधव आदींच्या सह्या आहेत.