आता कोरोनाच्या चौथ्या डोसची तयारी
Now preparing for the fourth dose of Corona
कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरिएंटने पुन्हा एकदा देशासमोर संकट निर्माण केलंय. देशात JN.1 व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नव्या JN.1 चे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह केसचे नमुने केंद्राच्या प्रयोगशाळेत पाठवण्यास सांगितले आहेत. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे लसीच्या चौथ्या डोसची आवश्यकता आहे का? याची विचारणा होत आहे.
आवश्यकता असेल तर चौथा डोस कधी मिळणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता सरकारने एक मोठी माहिती दिली आहे.
थंडीसोबतच कोरोनानेही देशासमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. JN.1 व्हेरिएंट हे Omicron चा उपप्रकार आहे. सिंगापूर येथे हा JN.1 प्रथम आढळून आला. तेथून तो चीन, अमेरिका, भारत आदी ४० हून अधिक देशात पसरला.
डब्ल्यूएचओने याला धोकादायक म्हटले आहे. तसेच याला ‘इंटरेस्ट ऑफ व्हेरिएंट’ असे नाव दिले आहे. ओमिक्रॉनच्या याच JN.1 नव्या व्हेरिएंटशी लढण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने नवी लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
भारत SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘देशात JN.1 प्रकाराची उपस्थिती निश्चितच चिंताजनक आहे,
६० वर्षांवरील व्यक्तींना श्वास घेण्यात अडचण येत असेल. तसेच ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी तिसरा डोस घेतला नसेल तर सावधगिरीचा उपाय म्हणून तिसरा डोस घ्यावा.
परंतु, सध्या तरी कोरोना लसीच्या चौथ्या बूस्टर डोसची गरज नाही. लोकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी आणि कोरोना नियमाचे जास्तीत जास्त पालन करावे असा सल्ला दिलाय.
JN.1 हा नवीन प्रकार जगभरातील अनेक देशांमध्ये आपला प्रभाव दाखवत आहे. यामुळे खूप लोक आजारी पडले आहेत. सुदैवाने, ओमिक्रॉनच्या नवीन उप-प्रकाराचा भारतात फार प्रभाव दिसून आला नाही.
या प्रकारामुळे गंभीर आजारी पडलेल्या कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्याची कोणतीही नोंद नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
INSACOG चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी कोरोनाच्या या नवीन प्रकारातील लक्षणांबद्दलही सांगितले आहे. JN.1 उप प्रकाराच्या लक्षणांमध्ये ताप, नाक वाहणे, खोकला, कधी कधी जुलाब आणि शरीरातील तीव्र वेदना यांचा समावेश आहे.
पण, हे साधारणपणे एका आठवड्याच्या आत दूर होतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आधीच राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
तसेच, चाचणी आणि कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास पुढील नमुने केंद्राकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती दिली.
दरम्यान, रविवारपर्यंत भारतात एकाच दिवसात 656 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ३,७४२ झाली आहे.