नवनीत रानांच्या अडचणीत वाढ !उमेदवारी दिल्यास बच्चू कडूंनी दिला निर्वाणीचा इशारा
Navneet Rana's problems increase! Allies have given a direct warning if they give candidature
अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास बंड करू, असा इशारा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारला दिला आहे.
नवनीत राणा यांच्याविषयी लोकांची प्रचंड नाराजी असून मी त्यांच्यासोबत काम करणार नाही, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी नवनीत राणा यांचे जोरकसपणे प्रयत्न सुरू आहेत.
पण त्यांच्या उमेदवारीला भाजपसह शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये, अशी विनंती भाजप तसेच शिंदे गटाचे नेते पक्षातील नेत्यांकडे करीत आहेत.
अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी देखील नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. जर विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली,
तर महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी महायुतीला दिला आहे. त्यामुळे अमरावतीत पुन्हा नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू असा वाद रंगण्याची शक्यता आहे.
महायुतीतील जागावाटपासंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसोबत चर्चा केली.
“मी नवनीत राणा यांच्याकडून देण्यात येत असलेली वागणूक मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. जर राणा उमेदवार असतील, तर आम्हाला बंड करावं लागेल”, असं बच्चू कडू म्हणाले.
नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार असतील तर आम्हाला युतीतून बाहेर पडण्याची संमती द्या, असं मत आम्ही मांडलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ४ तारखेला आपण बैठक घेऊ, असं आश्वासन दिलं आहे, असंही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं.