राष्ट्रवादीला उमेदवारांसाठी भाजपच्या अटी, शर्ती ?
BJP's terms and conditions for NCP candidates?
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पण अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीला जागावाटपाचा तिढा सोडवता आलेला नाही.
महायुती आणि महाविकास आघाडीत तीन-तीन घटकपक्ष असल्यानं तिढा कायम आहे. महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपकडे ९ जागा मागितल्या होत्या.
पण त्यांना ६ जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे त्या ६ जागांसाठीही अटी, शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी आहे.
राष्ट्रवादीला ६ जागा सोडण्यास भाजप तयार आहे. पण त्यातील २ जागांचे उमेदवार भाजपनं निश्चित केले आहेत. दोन्ही उमेदवार भाजपचे असून ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढतील.
तर राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा भाजपनं मित्रपक्षाला दिली आहे. त्यामुळे अजितदादांना सहापैकी केवळ तीनच जागांवर स्वत:चे उमेदवार देता येतील.
अन्य तीन जागांवरचे उमेदवार भाजपनंच निश्चित केले आहेत. हिंदुस्तान टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही भाजपचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे अजितदादा गटात अस्वस्थता वाढली आहे.
अजित पवारांनी भाजप नेतृत्त्वाकडे लोकसभेच्या ९ जागा मागितल्या होत्या. पण भाजपनं वाटाघाटीत सहा जागा देण्याचं मान्य केलं.
त्यातही निम्म्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार देता येणार नसल्यानं पक्षात नाराजी आहे. भाजपच्या अटी, शर्ती जाचक असल्याची भावना पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे. त्यामुळेच उमेदवारांची घोषणा करण्यात उशीर होत आहे.
भाजपनं राष्ट्रवादीला बारामती, रायगड, शिरुर, परभणी, सातारा आणि धाराशिव या सहा जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. यातील सातारा, धाराशिवमध्ये भाजप स्वत:चे उमेदवार देईल.
साताऱ्यातून उदयनराजे भोसले, तर धाराशिवमधून माजी सनदी अधिकारी प्रविण परदेशींना तिकीट देण्याची तयारी भाजपनं केली आहे.
परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना देण्यात येणार आहे. जानकर स्वत:च्या पक्षाच्या जागेवर लढतील.
अंतर्गत सर्व्हेंचा दाखला देऊन एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे उमेदवार बदलण्याच्या सूचना भाजपनं केल्या. त्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे.
पक्षात भाजप हस्तक्षेप करत असल्याची शिंदेसेनेच्या नेत्यांची भावना आहे. आता तसाच प्रकार राष्ट्रवादीत घडत आहे. अजित पवारांनी ९ जागांची मागणी केली.
पण भाजपनं सहाच जागा देण्याची तयारी दर्शवली. त्यातल्याही २ जागा भाजपनं स्वत:च्या उमेदवारांसाठी घेतल्या. तर एक जागा मित्रपक्षाला दिली. त्यामुळे भाजपसोबत जाऊन काय फायदा झाला, असा प्रश्न नेत्यांना पडला आहे.