ऐन निवडणुकीत काँग्रेसला धक्का! नेत्यांनी धरली भाजपची वाट
A shock to the Congress in the election! Leaders waited for BJP

महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानमध्येही विविध महामंडळे, प्राधिकरणे, परीक्षा आयोग आहेत, पण गेल्या पाच वर्षात या महामंडळावर किंवा प्राधिकरणांवर नेमणुकाच झालेल्या नाहीत.
या सर्व प्राधिकरणांची किंवा आयोगांची जबाबदारी सध्या अधिकाऱ्यांवरच आहे. यातून निर्माण झालेल्या नाराजीतून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपची वाट धरली आहे.
राज्यातील महामंडळे, प्राधिकरणे आणि आयोग यांच्यावरील राजकीय व्यक्तींच्या नियुक्त्यांकडे संबंधित राज्यातील दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची सोय म्हणून बघितले जाते.
पण मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गेल्या पाच वर्षात जोधपूर जिल्ह्यातील अशा एकाही प्राधिकरण किंवा महामंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याच केलेल्या नाहीत. आधीच उमेदवारीवरून असलेल्या नाराजीत यामुळे आणखी भर पडली आहे.
जोधपूरचे माजी महापौर रामेश्वर दादिच हे त्यापैकी एक. मुख्यमंत्री गेहलोत यांच्या जवळचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख. थेट जनतेतून आणि शहरातील तीन विधानसभा मतदार संघातून ते ६० हजारपेक्षा अधिक मतांनी महापौर म्हणून विजयी झाले होते.
दादिच हे ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्त्व आहेत. त्यांनी सुरसागर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली होती, पण त्यांना डावलून या मतदार संघातून काँग्रेसने युवा कार्यकर्ते शाहजाद खान यांना उमेदवारी दिली.
आपल्याला डावलल्याचे लक्षात आल्यानंतर दादिच यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली. आता या मतदार संघात भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिल्याने त्यांना दादिच यांच्या पक्षप्रवेशाचा फायदा होणार आहे.
ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष कन्हैयालाल पारिख यांच्या स्नुषा आणि महापौर पदाच्या काँग्रेसच्या उमेदवार पूजा पारिख यांनाही असेच डावलण्यात आल्यानंतर त्यांनीही काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
शाम खिचड, करुणानिधी व्यास, अजय त्रिवेदी असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. यातील व्यास यांचा जोधपूर शहरात मोठा प्रभाव आहे,
ते ब्राह्मण समाजाचे असल्याने त्यांची मदत सुरसागरसह अन्य मतदार संघात झाली असती, पण त्यांना डावलल्याने ते पक्षापासून दुरावले आहेत.
ही नाराजी फक्त काँग्रेसमध्येच नाही तर भाजपमध्येही पाहायला मिळाली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात भाजपने सुरेंद्रसिंह राठोड या प्राध्यापक म्हणून अलीकडेच निवृत्त झालेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे.
या मतदारसंघातून मारवाड जागरण मंचचे डॅा. गजेंद्रसिंह राठोड इच्छुक होते, पण त्यांना डावलण्यात आले. डॉ. गजेंद्रसिंह यांनी सुरसागरमधूनही उमेदवारीची मागणी केली होत, पण तिथेही त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही यामुळेच ते पक्षातच असले तरी सक्रिय दिसत नाहीत, अशी स्थिती आहे.
लोकांना हवा तसा उमेदवार दिला तर लोकही प्रचारासाठी बाहेर पडतात. निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर आले तरी जोधपूरमधील काँग्रेसच्या अथवा भाजपच्या प्रचारात उत्साह दिसत नाही. निवडणुकीचा जो माहोल हवा तसा माहोल तयार झालेला नाही. त्यातून मतांची टक्केवारी घटण्याची शक्यता आहे.