आनंदाची बातमी;शाळांच्या सुट्या 30 जूनपर्यंत वाढल्या
Good news; school holidays extended till June 30

दिल्ली सध्या प्रचंड उकाड्याने होरपळत असल्याचं चित्र समोर येत आहे. दक्षिण पावसाने हजेरी लावली असून उत्तरेत मात्र उन्हाचा तडाखा बसलाय.
जर उत्तर भारतात पाऊस पडला नाही तर दिल्लीत पारा 45 अंशांच्या पुढे जाऊ शकतो, अशी भीती देखील व्यक्त केली आहे.
अशातच आता दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने
नागरिक त्रस्त असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता दिल्ली सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली सरकारने एक परिपत्रक काढलंय, यानुसार दिल्लीतील सर्व शाळा प्रमुखांना उन्हाळी सुट्टीसाठी शाळा बंद ठेवण्याबाबत सूचना जारी करण्यात आली आहे. 11 मे रोजीच सरकारी शाळा बंद होत्या.
मात्र, काही खासगी शाळा सुरू असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर दिल्ली सरकारने शाळांमध्ये 11 मे ते 30 जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, 19 ते 23 मे दरम्यान दिल्लीत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
या काळात जोरदार उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात दिल्लीतील तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडतना योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये देखील सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 14 मे पासून 30 जूनपर्यंत शाळा बंद ठेवण्यात यावं,
असं शिक्षण विभागाने बजावलं आहे. अन्यथा कारवाईचे आदेश देखील देण्यात आलेत. तर नोएडामध्ये देखील सुट्ट्यांचे आदेश दिले जातील, अशी शक्यता आहे.