दाऊदमुळे प्रफुल्ल पटेलांना मंत्रिपद नाही ;संजय राऊतांचा दावा
Praful Patel does not have a ministerial position because of Dawood; Sanjay Raut claims
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा काल (९ जून) पार पडला असून ७१ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? असा थेट सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला.
कारण, सात खासदार असलेल्या शिंदे गटाला एक राज्यमंत्री पद देण्यात आलंय. तर, एक खासदार असलेल्या अजित पवार गटालाही एक राज्यमंत्री पद देण्यात येत होते.
परंतु, त्यांनी ते नाकारले. यावरून संजय राऊतांनी आज भाजपासह शिंदे आणि अजित पवार गटावर टीका केली. तसंच, प्रफुल्ल पटेलांबाबतही मोठा दावा केला आहे.
“काल नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. हे मोदी सरकार नाही किंवा भाजपाचं सरकार नाही. मोदींचं सरकार, मोदी तिसरी बार, मोदी गॅरंटी, सबकूछ मोदी असं काल चित्र नव्हतं.
एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलं आहे. चंद्राबाबू आणि नितीश बाबू या टिपूंचा इतिहास सर्वांना माहितेय. महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? पियुष गोयल मंत्री झाले.
ते स्टॉक एक्स्जेंच वाल्यांचे मंत्री आहेत. अजित पवारांच्या वाट्याला भोपळा आला आहे. दुसरे आहेत नकली शिवसेना. त्यांच्या तोंडावर राज्यमंत्री पद फेकलं आहे.
त्यांना मंत्रिपद मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं. नकली शिवसेनेचे सात खासदार आहेत, यांना त्यांची औकात दाखवली गेली. तुम्ही आमचे आश्रित आहात, असं भाजपाने दाखवून दिलंय”, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्री पद देऊ केलं होतं. परंतु, अजित पवार गटाने हे मंत्रिपद नाकारलं. यावरून संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे.
“अजित पवारांच्या बाबतीत आम्हाला असं समजलंय की, दाऊदशी संबंधित असलेली प्रफुल्ल पटेलांची १५० कोटींची प्रॉपर्टी क्लिअर केली. अजून काय पाहिजे?
ईडीने जप्त केलेली ही प्रॉपर्टी क्लिअर केली. त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. मग मंत्रिपद कशाला पाहिजे?”, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, त्यांनी एकच खासदार निवडून आलेल्या जतिनराम मांजी यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, “एकच खासदार निवडून आलेल्या जतिनराम मांजी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली, परंतु अजित पवार गटाला मंत्रिपद दिलं नाही.”
राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील महत्त्वाच्या घटक पक्षांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देण्यात आले आहे. लोकसभेत एक आणि राज्यसभेत एक असे दोनच खासदार असलेल्या राष्ट्रवादीला एक राज्यमंत्रीपद (स्वतंत्र कार्यभार) देण्याची तयारी भाजपने दर्शविली.
राष्ट्रवादीच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली जाणार होती. मात्र ते काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असल्याने आता राज्यमंत्रीपद स्वीकारणे योग्य ठरणार नसल्याचे पटेल यांचे म्हणणे होते.