ठाकरे गटाचे तीन लोकसभा उमेदवार ठरले?

Three Lok Sabha candidates of Thackeray group?

 

 

 

 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार ठरला आहे.

 

 

राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सध्या ठाकरे गटात असलेले संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

 

 

महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप नक्की झालेले नाही, परंतु ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आमचा आग्रह राहील. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय दिना पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा आमचा प्रयत्न असेल,

 

 

त्यांचं कर्तृत्व मोठं आहे, शिवसेनेची शाखाही इथे आहे. त्यामुळे सामोपचाराने, विनंती करुन आम्ही ती जागा मागून घेऊ, असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं.

 

 

 

 

ठाकरे गटाकडून आतापर्यंत गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांना त्यांच्याच वडिलांविरोधात उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानली जाते.

 

 

तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना पुन्हा तिकीट मिळणंही निश्चित आहे. याव्यतिरिक्त ठाकरे गट मुंबईतील कुठली जागा लढवणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

 

 

 

 

संजय दिना पाटील हे मुंबईतील प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. २००४ मध्ये पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुंबईतील भांडुप विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते.

 

 

 

त्यानंतर २००९ मध्ये त्यांना शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी दिली आणि ईशान्य पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते निवडूनही आले.

 

 

 

२०१४ मध्ये मात्र संजय दिना पाटील यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पाटील यांना पराभवाची धूळ चारली. तर २०१९ मध्ये ते पुन्हा खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले, परंतु भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी पराभूत केलं.

 

 

 

संजय दिना पाटील यांची ज्येष्ठ कन्या राजोल पाटील गेल्या काही महिन्यांपासून युवासेनेत कार्यरत आहेत. त्यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय दिना पाटील आपली जागा परत मिळवत पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुक आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *